कोपरगाव : पिकअपसह आठ जनावरे ताब्यात | पुढारी

कोपरगाव : पिकअपसह आठ जनावरे ताब्यात

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील येसगाव शिवारात 8 गोवंश जनावरांसह पिकअप व्हॅन कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत 8 गोवंश जनावरांसह पिकअप व्हॅन असा 3 लाख 28 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, ही सर्व जनावरे कोकमठाण येथील गोकुळधाममध्ये सुखरूप रवाना करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता येसगाव शिवारात पिकअप व्हॅनमधून जिवंत गोवंश जनावरे घेवून जात असलेली पिकअप व्हॅन कोपरगावच्या दिशेने येत असल्याची खबर पो. नि. दौलतराव जाधव यांना मिळाली.

पो.स.ई. धाकराव, स.फौ.आंधळे आदी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी पिकअप व्हॅन (क्र. एम. एच. 43 एफ 9443) कोपरगावकडे जाताना थांबवली. चालक बबलू इदू शेख (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी, ह. मु. कुरण, ता. संगमनेर) यास पिकअप व्हॅनमधील जनावरे कुठे घेवून चालला व उद्देश काय, असे विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आला. पिकअप व्हॅनमध्ये गायी, कालवडी व गोर्‍हे अशी 8 गोवंश जनावरे दाटीवाटीने उभी होती. दरम्यान, या जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीचा उद्देश असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

बेलापुरातही कारवाई..!
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुरातील झेंडा चौकातही बुधवारी तब्बल 11 गोवंश जनावरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Back to top button