नगर : आठ हजार परीक्षार्थी सज्ज! | पुढारी

नगर : आठ हजार परीक्षार्थी सज्ज!

नगर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यसेवा (पूर्व) परीक्षा रविवारी (दि.21) अहमदनगर जिल्ह्यातील 24 उपकेंद्रावर होणार आहे. एकूण 8 हजार 616 उमेदवारांची या उपकेंद्रावर (शाळा-महाविदयालय) बैठकव्यवस्था करण्यात आलेली आहे.

परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी 10 ते दुपारी 12 या दरम्यान पहिला, तर दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत दुसरा पेपर होणार आहे. एकंदरीत दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी-6 , भरारी पथक प्रमुख-1, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख – 24 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील एकूण 902 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याचे परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी सांगितले.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बूथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्वतः आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावयाची आहेत. दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयामधून देण्यात येणार नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा केंद्रप्रमुख संदीप निचित यांनी केले आहे.

…तर परीक्षेस कायमस्वरूपी बंदी

उमेदवारांना एकमेकांचे पेन, लिखान साहित्य वापरण्यास मनाई असणार आहे. मोबाईल पेजर डिजिटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने व कॅल्क्युलेटर आदी परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या उमेदवारास सदर परीक्षेसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे.

Back to top button