नगर : जेऊर पोलिस दूरक्षेत्राच्या जागेचे भिजत घोंगडे | पुढारी

नगर : जेऊर पोलिस दूरक्षेत्राच्या जागेचे भिजत घोंगडे

नगर तालुका, शशिकांत पवार : नगर तालुक्यातील जेऊर पोलिस दूरक्षेत्राची जागेअभावी परवड सुरू असून, पोलिस कर्मचार्‍यांचे अतोनात हाल सुरू आहेत. या बाबीकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी तत्काळ लक्ष घालून पोलिस दूरुक्षेत्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.

जेऊरला पोलिस दूरक्षेत्र मंजूर आहे. परंतु दूरक्षेत्राला हक्काची जागाच नाही. पूर्वी जेऊर ग्रामपंचायतीच्या जागेतून दूरक्षेत्राचे काम सुरू होते. त्यातच ग्रामपंचायतीने पोलिसांना जागा खाली करण्याचे पत्र दिले होते. ही जागा पुरेशी नव्हती. अत्यावश्यक सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या. ग्रामपंचायतीकडून जागा खाली करण्याच्या पत्रानंतर पोलिस ठाण्याकडून जेऊर ग्रामपंचायतीला पत्र देऊन दूरक्षत्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर या विषयाकडे कोणताही पदाधिकारी, अधिकार्‍यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे जागेचा प्रश्न रेंगाळतच पडला आहे.

सद्यस्थितीत टोल नाक्यावरील छोट्याशा खोलीतून जेऊर पोलिस दूरुक्षेत्राचे कामकाज सुरू आहे. टोलनाक्याची मुदत संपल्याने ती जागाही खाली करावी लागणार आहे. पोलिस दूरक्षेत्राला हक्काची जागा व इमारत नसल्याने पोलिस कर्मचार्‍यांचे हाल होत आहेत. अनेक गावांनी पोलिस दूरक्षेत्र मंजूर व्हावे, यासाठी नागरिक आंदोलन करीत निवेदन देत असतात. परंतु जेऊर गावात मंजूर असलेल्या दूरक्षेत्राला जागेअभावी परवड सहन करावी लागत आहे.

दूरक्षेत्राकडे दुर्लक्षाचा फायदा जेऊर, धनगरवाडी, बहिरवाडी, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उज्जैनी, ससेवाडी, इमामपूर, खोसपुरी, पांगरमल, उदरमल, मजले चिंचोली या गावांतील नागरिकांना होणार आहे. महामार्गावरील रस्तालूट, चोर्‍या, अपघातग्रस्तांना तत्काळ मदतीसाठी दूरक्षेत्राची गरज आहे. मात्र या गंभीर विषयाकडे अधिकारी, पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जेऊरच्या ग्रामसभेत पोलिस दूरक्षेत्राला जागा देण्याबाबतचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. नगर-औरंगाबाद महामार्गालगत जेऊर पोलिस दूररुक्षेत्राला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जेऊर पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत आहे.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालावे.

नगर-औरंगाबाद महामार्गालगत धनगरवाडी शिवारात, तसेच जेऊर येथेही शासकीय मोकळी जागा आहे. जुनी नगर वाट येथे असणारी शासकीय जागा पोलिस दूरक्षेत्राला सोयीस्कर अशी आहे. सदर शासकीय जागेची मोजणी करून ती तत्काळ पोलिस दूरक्षेत्रासाठी देण्यात यावी. त्यासाठी धनगरवाडी तसेच जेऊर ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला देण्यात येणार आहे. परंतु पुढील हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी व सुसज्ज असे पोलिस दूरक्षेत्र बांधण्यासाठी जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

जेऊर गावाला अतिक्रमणांचा विळखा

जेऊर गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहेत. बाजारपेठ अतिक्रमणात वसलेली आहे, तसेच इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले दिसून येते. एकंदरीत जेऊर गावाला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी ग्रामपंचायतीला आदेश देखील दिले आहेत. गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असताना पोलिस दूरक्षेत्रालाच जागा देण्यात अडचण का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Back to top button