नगर : जनावरे चोरणार्‍या टोळ्यांचा उच्छाद

नगर : जनावरे चोरणार्‍या टोळ्यांचा उच्छाद

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात गावागावांमध्ये शेतकर्‍यांचे पाळीव जनावरे चोरणार्‍या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या महिनाभरात अनेक शेतकर्‍यांच्या शेळ्या, मेंढ्या, जर्शी गायी, खिलार बैलांच्या चोर्‍या झाल्या आहेत. त्यामुळे वाडीवस्तीवर राहणार्‍या शेतकर्‍यांच्या झोपा उडाल्या आहेत. शेतकर्‍यांना दिवसभर काम करून चोरट्यांच्या भीतीने रात्र जागून काढावी लागत आहे.

नगर तालुक्यातील गावामध्ये चोरी, घरफोडीच्या घटनामध्ये कमालीची वाढ झाली आहे. ग्रामीण भागातून जनावरे, शेतकर्‍याच्या शेतातील वस्तू, दुचाकी चोरीच्या घटना दररोज घडत आहेत. एकाच रात्रीत विविध गावांमध्ये चोर्‍या होत असल्याने चोरट्यांच्या एकापेक्षा अनेक टोळ्या सक्रिय असण्याची शक्यता असून, त्याचा शोध मात्र पोलिसांना अद्याप लागलेला नाही.

नगर तालुक्यात विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी वाडी-वस्तीवर राहणार्‍या लोकांचे प्रमाणही जास्त आहे. गेल्या महिन्याभरात शेतकर्‍याच्या शेतामधून इलेक्ट्रिक मोटारी, स्टार्टर, केबल व इतर शेतीपयोगी साधने चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या. मध्यंतरी नगर तालुका पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटारी चोरणार्‍यांना अटक केली होती. भिंगार कॅम्प पोलिसांनीही काही चोरटे पकडले होते, तरीही या घटना थांबायला तयार नाहीत.

दुसरीकडे, शेतकर्‍यांच्या गोठ्यांमधून शेळ्या, मेंढ्या, गायी, बैल चोरीला जात आहेत. याचे प्रमाणाही गेल्या महिनाभरात वाढले आहेत. जनावरांचे चोरी करणार्‍यांचा शोध मात्र भिंगार कॅम्प, एमआयडीसी, नगर तालुका पोलिसांना अद्याप लागलेला नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसही यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. ठरावीक टोळ्यांकडून जनावरे व शेतातील मोटारी चोरून अन्य ठिकाणी विक्री केल्या जात असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

वाळुंजमधून शेळ्या, बोकड चोरीस

नगर तालुक्यातील वाळुंज शिवारात चोरट्यांनी अविनाश गोवर्धन शिंदे यांच्या घराशेजारील गोठ्यातून 4 शेळ्या व 1 बोकड चोरून नेला. रविवारी (दि.14) रात्री 11 ते सोमवारी (दि.15) पहाटे 12.30 या कालावधीत ही घटना घडली. याबाबत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'या' गावांमधून जनावरांच्या चोर्‍या!

सारोळा कासार येथील नामदेव नाथा काळे (रा. काळे मळा) यांच्या गोठ्यातून 8 जुलैला पहाटे 2 जर्शी गायी चोरीला गेल्या. त्या पाठोपाठ संतोष गुलाबराव काळे यांची एक शेळी, दुसर्‍या आठवड्यात रेल्वे स्टेशन परिसरातील भानुदास धामणे यांच्या 2 जर्शी गायी चोरीस गेल्या. अकोळनेर येथील बाळासाहेब प्रकाश जाधव यांच्या गोठ्यातून गावरान व पंढरपुरी बैलजोडीची चोरी झाली. भोरवाडीतून खिलार बैल चोरीस गेला. चास येथून 2 गायींची चोरी झाली. अरणगाव शिवारातील सोन्याबापू मुदळ यांच्या शेळ्या चोरीस गेल्या. याबरोबरच खडकी, वाळकी, वडगाव तांदळी, रुईछत्तीशी, इमामपूर परिसरातूनही अनेक जनावरे चोरीला गेली आहेत. वाळकी परिसरातून महिनाभरात 25-30 पेक्षा जास्त शेळ्या, मेंढ्या चोरीला गेल्या असून, त्याची पोलिस दप्तरी नोंदही झालेली नाही.

चोरट्यांची मेंढपाळांवर दगडफेक

सारोळा कासार शिवारात संतोष काळे यांच्या शेताजवळील डोंगरावर मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळांच्या तळावर सोमवारी (दि.15) रात्री 12.30 च्या सुमारास चोरट्यांनी हल्ला केला. 6 ते 7 चोरटे सुमारे तासभर मेंढपाळांवर दगडांचा वर्षाव करत होते. मात्र, मेंढपाळांनी चोरट्यांचा कडवा प्रतिकार केला. मेंढपाळांची आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेला चोरटे आल्याची माहिती दिली. त्यावेळी काही तरुण मेंढपाळांच्या मदतीला धावले. बॅटर्‍यांचा उजेड दिसताच चोरट्यांनी पळ काढला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news