वृद्धेश्वर परिसरातील पार्किंगचा प्रश्न मिटणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले | पुढारी

वृद्धेश्वर परिसरातील पार्किंगचा प्रश्न मिटणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : मी भाविक, तसेच वृद्धेश्वरावरील श्रद्धेपोटी दर्शन घेण्यासाठी आलो असून, दर्शन घेतल्यानंतर मन अतिशय प्रसन्न झाले. सर्वांच्या मनो इच्छित कामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी मी भगवान वृद्धेश्वराकडे प्रार्थना केली आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी असते. यात्रा कालावधीतही येणार्‍या भाविकांच्या वाहनाच्या पार्किंगची मोठी समस्या आहे. हा प्रश्न लक्षात घेता वृद्धेश्वर देवस्थानचे पुजारी, जमिनीच्या वहिवाटदारांनी पार्किंगसाठी लागणारी जागा देण्याचे मान्य केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

श्रावणी सोमवारनिमित्त पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर येथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले दर्शनासाठी आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे, देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश पालवे, मुरलीधर पालवे, डॉ. मृत्युंजय गर्जे, डॉ. सुहास उरणकर आदी उपस्थित होते.
जिल्हा अधिकारी भोसले म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्यानिमित्त आजादी का अमृत महोत्सव आयोजित केला जात आहे. जिल्ह्यात घरासह सर्वच ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वृद्धेश्वर देवस्थानच्या मंदिर गाभार्‍यात आकर्षक सजावट करून महादेवाच्या पिंडीवर तिरंगा झेंडा लावून धर्माबरोबर देशाचा अभिमान या देवस्थानकडून दिसून आला आहे.

 

Back to top button