नगर : कोरठणला रंगला कुस्त्यांचा आखाडा | पुढारी

नगर : कोरठणला रंगला कुस्त्यांचा आखाडा

कान्हूरपठार, पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिन्यातील तिसर्‍या रविवारची पर्वणी साधून परंपरेप्रमाणे पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान यात्रेनिमित्त देवस्थान व ग्रामस्थांनी कुस्त्यांचा आखाडा आयोजित केला होता. यावेळी नामवंत मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करीते आखाडा चांगलाच गाजविला.

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर कोरठण गडावर कुस्त्यांचा आखाडा भरल्यामुळे कुस्तीप्रेमी भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. पावसाळी वातावरण असतानाही शेकडो कुस्तीप्रेमी व पैलवान मंडळींनी कुस्ती आखाड्यामध्ये गर्दी केली होती. याप्रसंगी पारनेर तालिम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे, दिनेश घोलप, गुंडा भोसले, रामभाऊ सासवडे, प्रकाश चिकणे, साहेबराव चिकणे, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, किसन धुमाळ, गोपीनाथ घुले, उपसरपंच महादेव पुंडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारनेर, नगर, शिरूर, हरियाना, जुन्नर, अकोले आदी ठिकाणाहून नामांकित पैलवानांनी हजेरी लावत निकाली कुस्त्या केल्या. कुस्तीप्रेमींनी पहिलवानांना वैयक्तिक इनाम देऊन चांगली दाद दिली. या आखाड्यात शेवटची कुस्ती 15 हजार रुपये इनामावर उत्तर महाराष्ट्र केसरी अनिल ब्राह्मणे आणि योगेश पवार यांची झाली. जालिंदर खोसे व उत्तम सुंबरे यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button