नगर : जवळ्यात विवाहितेचा गळा आवळून खून | पुढारी

नगर : जवळ्यात विवाहितेचा गळा आवळून खून

पारनेर / जवळा, पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत तिचा गळा दाबून खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील जवळा घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्याला 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व सहायक निरीक्षक हनुमान उगले यांनी दिली.

रूपाली महेश सालके (वय 32) असे मृत महिलेचे, तर महेश भास्कर सालके (वय 35) असे तिच्या पतीचे नाव आहे. जवळा येथील सालके वस्तीवरील शेतकरी कुटुंबातील या पती-पत्नीचा 13 ऑगस्ट रोजी दुपारी राहत्या घरात वाद झाला. या वादातून पतीने दारूच्या नशेत पत्नीचा जोरात गळा दाबला. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. घरातील वादाचा परिसरातील नागरिकांना आवाज आल्याने त्यांनी घराकडे धाव घेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, घराला आतून कडी असल्याने दरवाजा उघडता आला नाही. शेवटी नातेवाईक व शेजार्‍यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना रुपाली ही निपचित पडलेली आढळली. त्यामुळे तिला तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी तिचा भाऊ किरण डोखे व इतर नातेवाईकांना दिली.

याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ किरण भास्कर डोखे (रा. डोणगाव, ता.वैजापूर, जि. औरंगाबाद) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रूपाली हिने बहीण स्वप्नाली हिच्याकडून दहा हजार रुपये उसणे घेतले होते. परंतु, तिने हे पैसे चुकीच्या मार्गाने कमवून आणल्याचा संशय घेऊन तिला पती महेश सालके याने ठार मारल्याचे किरण डोखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमंत उगले हे करीत आहेत.

बहीण-भावांचे शेवटचे रक्षाबंधन

नवर्‍याच्या जाचामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी चार भावांपैकी एकालाही राखी न बांधताच आपल्या चिमुकल्या पोटच्या गोळ्यांसाठी बहीण रूपाली सासरी जवळ्याला आली. पण, आता या घटनेमुळे ती परत कधीच न येणार नाही, या भावनेने चारही भावांच्या अश्रूंचा बांध फुटला. राखी न बांधता परतलेल्या बहिणीमुळे त्यांच्यासाठी ते शेवटचेच रक्षाबंधन ठरले.

दोन चिमुकले झाले अनाथ

रुपाली हिस दोन मुले असून, मोठा मुलगा इयत्ता पाचवीत, तर दुसरा मुलगा इयत्ता तिसरीत शिकत आहे. ही चिमुकली दोन्ही मुले आता अनाथ झाल्याने व आई-वडिलांच्या मायेला पारखी झाल्याने अंत्यविधीच्या वेळी त्यांचा वेदनादायी आक्रोश पाहून उपस्थितांचा उर भरून येत होता. अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

Back to top button