भापकरकडून माऊंट युनाम शिखर सर, 20100 फूट उंची; कोंभळीच्या शिरपेचात मानाचा तुरा | पुढारी

भापकरकडून माऊंट युनाम शिखर सर, 20100 फूट उंची; कोंभळीच्या शिरपेचात मानाचा तुरा

कोंभळी; पुढारी वृत्तसेवा: कमीत कमी तापमान, प्रचंड बर्फवृष्टीसह झोंबणारे वारे अन् अतिशय कमी ऑक्सिजन पातळी, अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात न डगमगता कर्जत तालुक्यातील कोंभळी येथील अक्षय राजेंद्र भापकर या गिर्यारोहकाने हिमाचल प्रदेशातील लाहौल भागातील माऊंट युनाम या 20 हजार 100 फूट उंच शिखरावर यशस्वी चढाई करून भारताचा राष्ट्रध्वज फडकविला.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवा निमित्त ही कामगिरी करून ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक अक्षय भापकर यांनी कोंभळीसह अहमदनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल भागातील माऊंट युनाम शिखर समुद्र सपाटी पासून 6111 मीटर (20100 फूट) उंच आहे.

माऊंट युनाम गिर्यारोहण मोहिमेची सुरुवात 7 ऑगस्टला मनाली जवळील नग्गर येथून झाली. जिस्पा, भरतपूर मार्गे 16 गिर्यारोहकांचा चमू भरतपूर बेस कॅम्प ला पोहोचला. समिट बेस कॅम्प 17400 फूटांवर आहे. येथे अचानक हवामान खराब होऊन हिमवर्षाव सुरू झाला. बाजूच्या पर्वतावर रॉक फॉल होऊ लागले. अनेक गिर्यारोहकांना विरळ हवेमुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. कमी ऑक्सिजन आणि खराब हवामानामुळे अनेकांना माघारी परतावे लागले.

बर्फवृष्टी थांबल्याने 13 ऑगस्टला रात्री 12:30 वाजता शिखर सर करण्यासाठी चढाई सुरु केली. अक्षय भापकर यांच्यासह आठ गिर्यारोहकांना सकाळी 7:45 वाजता शिखर सर करण्यात यश आले. माऊंट योुनाम शिखर सर करताच तिरंगा फडकावत भारतमातेला अनोखी मानवंदना दिली. सोबतच भगवा फडकवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. अक्षय भापकर यांच्या यशाने गिर्यारोहण क्षेत्रात अहमदनगरचे नाव उंचावले आहे . या मोहिमेसाठी गिरीप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, मोहीम प्रमुख गिर्यारोहक सुमित मांदळे, ट्रेकयात्रीचे रवींद्र चोभे, तेजस स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Back to top button