

बोटा/संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील साकूर येथे गेल्या काही दिवसांपासून माकडाने उच्छाद मांडला होता. काही बालकांवर हल्ले करीत चावा घेत माकडाने साकूर परिसरात दहशत पसरविली होती. वन पथकाने या माकडास पकडण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापरल्या. परंतु, वारंवार अपयश पदरी आले. अखेर वन कर्मचार्यांनी माकडीण आणून त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याची अनोखी शक्कल यशस्वी झाली. हल्लेखोर माकडास हनीट्रॅपमध्ये ओढत डॉट इंजेक्शन मारुत बेशुद्ध करुन अखेर जेरबंद करण्यात आल्याने पठार भागातील अबालवृद्धांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
साकूर येथील सानवी इघे, नगमा मोमीन या दोन लहान मुलींवर माकडाने हल्ला करीत चावा घेत गंभीर जखमी केले. साकूर परिसरात अशा सुमारे 25 हून अधिक व्यक्तींना माकडाने चावा घेत जखमी केले. दरम्यान, शुक्रवारी (दि. 12) दुपारी संगमनेर वनविभाग -3 चे वनक्षेत्रपाल सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तास्करवाडी रोडवर वन कर्मचारी हनुमंत घुगे, सुहास उपासणे, संतोष पारधी, हरिश्चंद्र जोजार, बाळासाहेब फटांगरे, रामदास वर्पे यांनी रेस्क्यू ऑपरेशन केले. यासाठी स्थानिक सर्पमित्र सागर डोके, रामा केदार, राजू झिटे यांनी माकड पकडण्यास सहकार्य केले. माकड पकडण्यासाठी माकडीणीचा हनीट्रॅप लावत प्रेमाच्या जाळ्यात ओढत डॉट इंजेक्शन देवून पकडण्यात आले.
पंधरा दिवसांपासून माकडाने साकूर परिसरात शाळकरी मुलांवर हल्ला केल्याने पालक व ग्रामस्थ हैराण झाले होते. माझी मुलगी सानवी इघे हिच्यावर माकडाने हल्ला करुन, जखमी केले. परंतु, वनविभागाने हल्लेखोर माकडास जेरबंद करण्यास माकडीणीला आणून त्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. या अनोख्या शक्कलबाबत त्यांचे कौतुक! सुनील इघे, सामाजिक कार्यकर्ते. पकडलेले माकड बर्याच दिवसांपासून हल्ले करीत होते. हे माकड पकडण्यास माकडीणीला आणण्याची युक्ती प्रभावी ठरली. त्यामुळे माकडास पकडणे शक्य झाले. या माकडावर पशू वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत. सुभाष सांगळे, वनपाल