नगर : आठ लाख इमारतींवर फडकला तिरंगा | पुढारी

नगर : आठ लाख इमारतींवर फडकला तिरंगा

नगर : पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील 8 लाख 157 इमारतींवर भारतीय तिरंगा झेडा दिमाखात फडकत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 6 लाख 65 हजार 9 घरांचा समावेश आहे. जवळपास 89 टक्के इमारतींवर तिरंगा झेंडा डौलाने फडकत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. त्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद तसेच शासनाच्या विविध विभागांच्या वतीने प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात 8 लाख 99 हजार 666 घरांवर तिरंगा फडकविण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

त्यानुसार पहिल्याच दिवशी शनिवारी जिल्ह्यातील 8 लाख 157 इमारतींवर तिरंगा फडकविण्यात आला आहे. यामध्ये सरकारी आस्थापना, दुकाने व घरांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 6 लाख 65 हजार 9 घरांवर तर नगरपालिका क्षेत्रातील 1 लाख 7 हजार 768 घरांवर झेंडा फडकला आहे. नगर शहरातील 27 हजार 380 घरांवर देखील तिरंगा फडकविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
हर घर तिरंगा हा उपक्रम सलग तीन दिवस राबविला जाणार आहे.

त्यामुळे प्रत्येक घरावर उभारण्यात आलेला तिरंगा सलग तीन दिवस फडकला जाणार आहे. 15 ऑगस्टर रोजी सायंकाळी भारतीय तिरंगा ध्वज उतरविला जाणार आहे. भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

Back to top button