2024 पर्यंत निळवंडेची जलगंगा शेतकर्‍यांच्या बांधावर : प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

2024 पर्यंत निळवंडेची जलगंगा शेतकर्‍यांच्या बांधावर : प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  अडीच वर्षे कोरोना कालखंडात अडचणी असतानाही सुमारे 1 हजार कोटींचा निधी वितरीत केल्याने निळवंडे कालवा प्रश्न मार्गी लागला आहे. सन 2024 पर्यंत या कालव्याद्वारे शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोहोचेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. दरम्यान, सन 1990 पासून मी विधान सभेमध्ये कार्यरत आहे. एकही अधिवेशन असे गेले नाही की, ज्यावेळी निळवंडेच्या कालव्यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचा महत्त्वाचा प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्यासह माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. प्राजक्त तनपुरे, आ. किरण लहामटे व आ. आशुतोष काळे यांनी नेहमी पाठपुरावा केला, असे आ. पाटील यांनी सांगितले.

राहुरी तालुक्यातील निंभेरे येथील डोंगरातून पोखरून तयार केलेल्या 2.250 कि.मी. अंतराच्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर निळवंडेचे पाणी राहुरीतपर्यंत पाणी पोहोच होण्याचा मार्ग मोकळा झाला. जलसंपदा खात्याचे मंत्री असताना आ. पाटील यांनी अडीच वर्षांत 1 हजार कोटी रुपयांचा निधी दिला. त्यानुसार निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने आ. पाटील व आ. तनपुरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जेसीबीतून पुष्प उधळत ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. निंभेरे गावातील एका मुख्य चौकामध्ये मिरवणुकीचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी आ. पाटील बोलत होते.

ते म्हणाले, कोरोना सारख्या कालखंडात निधीची मोठी अडचण होती, परंतु माजी खा. तनपुरे यांनी राहुरीत बोलाऊन घेत जलसंपदा खात्यामार्फत निळवंडेसाठी निधी कमी पडू देऊ नका, असे सांगितले. आ. तनपुरेंसह आ. थोरात यांनीही निळवंडे कालव्यासाठी पाठपुरावा केला. परिणामी केवळ अडीच वर्षांमध्ये सुमारे 1 हजार कोटी निधी निळवंडे कालव्यास दिल्याचे समाधान आहे, असे सांगत आ. पाटील म्हणाले, भाजपने सन 2014 ते 19 पर्यंत 377 कोटी रुपये निधी दिला, परंतु शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात घेता महाविकास आघाडी शासन काळात कोरोनाचे संकट असतानाही केवळ अडीच वर्षांमध्ये 1 हजार कोटींचा निधी दिला. निळवंडेचे पाणी राहुरीपर्यंत पोहोचण्यास अडसर राहिलेला नाही, असे आ. पाटील ठामपणे म्हणाले.

अध्यक्षस्थानावरुन आ. तनपुरे यांनी, सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस शासनाने जनसामान्यांची थट्टा केल्याची टीका केली.
यावेळी जि. प. माजी अध्यक्ष अरुण कडू, निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार, मच्छिंद्र सोनवणे, प्रा. विजय सिनारे, गंगाधर गमे यांचे भाषण झाले. यावेळी जि. प. माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, साई संस्थान विश्वस्त सुरेश वाबळे, जि. प. सदस्य धनराज गाडे, नंदाताई गाढे, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, धनश्याम शेलार, सरपंच अलकाताई सिनारे, माजी सभापती मनिषाताई ओहोळ, धीरज पानसंबळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रभाकर गाडे, सुरेशराव निमसे, रविंद्र आढाव, नितीन बाफना, सुयोग नालकर, गंगाधर जाधव, ज्ञानेश्वर बाचकर, ताराचंद तनपुरे, आदिनाथ तनपुरे, नंदकुमार तनपुरे, राजू सिनारे, किरण गव्हाणे, किसन जवरे, बाबा कल्हापूरे, भास्कर गाढे, महेश उदावंत, निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, डॉ. रवींद्र गागरे, मच्छिंद्र येलम, जालिंदर लांडे, दिनकर लोंढे, किशोर गागरे, ह.भ.प. संजय शेटे आदींसह निंभेरे, तांभेरे, कानडगाव, वडनेर, तुळापूर, गुहा, सात्रळ, सोनगाव आदी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

मामा-भाच्यावर फुलांची उधळण..!
निळवंडे कालवा कृती समितीच्या सदस्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण करीत मामा आ. जयंत पाटील व भाचे आ. प्राजक्त तनपुरे यांची मिरवणूक काढण्यात आली होती. निळवंडेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे समाधान शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसले.

कर्डिलेंना मिश्किल टोला..!
सन 2014 मध्ये राहुरीचे लोकप्रतिनिधीपद मिळविल्यानंतर माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी दोन वर्षांत निळवंडेचे पाणी आणले नाही, तर 'हाणा' असे सांगितले, परंतु निळवंडेचे पाणी पोहोच न झाल्याने लोकांनी मतदानातून 'त्या' खोटे बोलणार्‍यांना जागा दाखवून दिल्याचे आ. तनपुरे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news