सात खासगी सावकारांना बेड्या, श्रीगोंद्यातील व्यावसायिकाचे आत्महत्या प्रकरण | पुढारी

सात खासगी सावकारांना बेड्या, श्रीगोंद्यातील व्यावसायिकाचे आत्महत्या प्रकरण

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा येथील वडापाव व्यावसायिक शिवराम वहाडणे यांनी दोन दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने श्रीगोंदा शहरासह तालुक्यात सुरू असणार्‍या बेकायदा खासगी सावकारकीचा विषय ऐरणीवर आला आहे. वहाडणे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या सात खासगी सावकारांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. आणखी आठ खासगी सावकार पोलिसांच्या रडारवर आहेत. भास्कर बापू सांगळे, बापू चव्हाण, राहुल रमेश धोत्रे, राजू पांडुरंग बोरुडे (सर्व रा. श्रीगोंदा), कांतीलाल सदाशिव कोकाटे (रा. घोडेगाव), जयसिंग चंद्रकांत म्हस्के (रा. चांडगाव), अक्षय रोहिदास कैदके (रा. लिंपणगाव) अशी अटक करण्यात आलेल्या खासगी सावकारांची नावे आहेत.

वहाडणे यांनी व्यवसायासाठी काही खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. हे सावकार पैसे व व्याजाच्या रकमेसाठी वारंवार तगादा लावत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वहाडणे यांनी लिहून ठेवलेल्या चिट्ठीत जवळपास पंधरा खासगी सावकारांची नावे व त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या नोंदी त्यामध्ये आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या या चिट्ठीच्या आधारे या सात जणांना अटक केली आहे. तपासात ज्या व्यक्तींचे बेकायदा व्याजाने पैसे असल्याचे निष्पन्न होईल, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी स्पष्ट केले.

सावकारकीचा मुद्दा हा शिवराम वहाडणे यांच्या आत्महत्येपुरता मर्यादित नसून, तो अनेकांचा प्रपंच धुळीस मिळवणारा आहे. श्रीगोंदा शहरासह ग्रामीण भागात सावकारकीचे लोण पसरले असून, गरजेपोटी अशा सावकारांकडून घेतलेल्या पैशाला अव्वाचे सव्वा व्याज लावून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. वेळेवर पैसे न गेल्याने मुद्दल अधिक व्याजाची रक्कम वाढत जाते अन् हजारात असणारी मुद्दल लाखात कधी जाते, हे समजत नाही. अन् मग सुरू होते सावकाराचे दृष्टचक्र अन् त्यातूनच घडतात आत्महत्या. हे सावकार दहा रुपये ते चाळीस रुपये शेकडा दराने पैसे देत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा सावकारकीला वेळीच प्रतिबंध न घातल्यास आणखी आत्महत्या झाल्यास नवल वाटायला नको.

तरुणपिढी सावकारकीच्या विळख्यात
श्रीगोंदा तालुक्यातही खासगी सावकारकीचे मोठे पेव फुटले असून या सावकारकीच्या विळख्यात तरुण पिढी अडकली जात आहे. आजची निकड भागविण्यासाठी वीस ते चाळीस टक्के दराने पैसे व्याजाने घेतले जात आहेत. ही खासगी सावकारकी चालविण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यान्वित असल्याचे दिसून येत आहे.

व्याज भरता भरता जमीन गेली !
तालुक्याच्या पूर्व भागातील एका शेतकर्‍याने जमीन विकसित करण्यासाठी अशाच एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले. मात्र, व्याजाची रक्कम व व्याज वेळेत न गेल्याने पैशांचा आकडा फुगतच गेला आणि मग ही रक्कम मिटविण्यासाठी त्या शेतकर्‍याला जमीन विकण्याची वेळ आली.

कर्जत पॅटर्न राबविण्याची गरज
कर्जत तालुक्यात सावकारकीचे मोठे पेव फुटले होते. सावकारांच्या त्रासाने अनेकांना नैराश्य आले होते. मात्र, तेथील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी खासगी सावकारकी विरोधात ठोस पावले उचलत कारवाई केली.अशी मोहीम श्रीगोंदा तालुक्यात राबविल्यास खासगी सावकारकीचा बीमोड होण्यास वेळ लागणार नाही.

Back to top button