तिरंगा ध्वज विक्रीवरून करंजीकरांमध्ये संभ्रम | पुढारी

तिरंगा ध्वज विक्रीवरून करंजीकरांमध्ये संभ्रम

करंजी : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून, त्यानिमित्ताने प्रत्येक घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला तिरंगा ध्वजाचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतु, पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे मात्र ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी सुरुवातीचे दोन दिवस हॉटेल व्यावसायिकांना 30 रुपयांप्रमाणे तिरंगा ध्वजाची रोख स्वरुपात विक्री केली.

त्यानंतर याच कर्मचार्‍यांनी गावात पावती न देता प्रत्येक कुटुंबाला एक तिरंगा ध्वज वाटप सुरू केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आधी रोख रकमेत दिला जाणारा ध्वज नंतर मात्र उधारीवर देण्याची वेळ ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांवर आली. त्यामुळे पैसे देऊन ध्वज मिळणार आहे की मोफत दिला जात आहे, याची देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अमृतमहोत्सवानिमित्त प्रत्येक कुटुंबाला तिरंगा ध्वज देण्याचे नियोजन करण्यात आले असून, कोणालाही मोफत ध्वज मिळणार नाही. ज्यांना तिरंगा ध्वज देण्यात येत आहे, त्यांच्याकडून नंतर का होईना ध्वजाचे पैसे वसूल केले जाणार आहेत.
                                                               –  रविकुमार देशमुख,  ग्रामसेवक

Back to top button