नगर : शहरातील मोकाट कुत्र्यांना लस टोचा | पुढारी

नगर : शहरातील मोकाट कुत्र्यांना लस टोचा

नगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून, नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सर्वच मोकाट कुत्र्यांना अ‍ॅटी रेबिज लस टोचा. त्याचबरोबर निर्बिजीकरणाची संख्या वाढवा. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी संबंधित संस्थेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना दिला.

महापालिकेतंर्गत स्थापन करण्यात आलेल्या अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल कमिटीची बैठक आयुक्त डॉ. पंकज जावळे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेचे डॉ. गिते, कोंडवाडा विभागाचे प्रभारी अधिकारी अविनाश हंस यांच्या उपस्थितीत झाली. मोकाट कुत्र्यांचे लसीकरण व निर्बिजीकरण, तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचा ठेका पिपल्स फॉर अनिमल या संस्थेला देण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी कायनेटिक चौकात एकाच कुत्र्याने सहा जणांना चावा घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. जावळे यांनी ही बैठक बोलाविली होती. त्यात संबंधित संस्थेने वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला.

आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, शहरातील सर्वच मोकाट कुत्र्यांचे लसीकरण करा. त्यांच्यापासून नागरिकांना कुठलाही धोका होणार नाही, याची दक्षता घ्या. मोकाट कुत्र्यांचे निर्जिबीकरण करा. निर्जिबीकरण केल्यानंतर विविध रंगाच्या टॅगिंग करा. पिपल्स फॉर अनिमल संस्थेने चोवीस तास काम सुरू ठेवावे. येत्या सात दिवसांत त्याचा अहवाल सादर करा. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

शहरात मोकाट जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही जनवारे रस्त्यावर बसून वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्या मोकाट जनवारांचा सात दिवसांत बंदोबस्त करा, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

मोकाट जनावरांचे सर्वेक्षण होणार

शहरामध्ये 2019 मध्ये मोकाट जनवारे आणि मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी शहरात सुमारे पाच हजार मोकाट कुत्रे होते. त्यांची संख्या आता नक्कीच वाढली असेल. त्यामुळे पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Back to top button