नगर : पोलिसाला मारहाण; अकरा जणांवर गुन्हा | पुढारी

नगर : पोलिसाला मारहाण; अकरा जणांवर गुन्हा

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल अनिल कारभारी खताळ (वय 51, साईनगर, घुलेवाडी) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घरात कोंडून ठेवले. याप्रकरणी घुलेवाडीतील 11 जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना बुधवारी सकाळी 10 वाजता घुलेवाडीच्या साईनगरमध्ये घडली असून, त्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खताळ व त्यांचा मुलगा घरी असताना मोठा जमाव त्यांच्या घुलेवाडीच्या घरी लाकडी काठ्या व गज घेऊन आला होता. खताळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना घरात कोंडून बाहेरून कुलूप लावण्यात आले.

या प्रकरणी अलका अनिल खताळ, कुसूम निवृत्ती राहाणे, निवृत्ती किसन राहाणे, कैलास निवृत्ती राहाणे, शरद निवृत्ती राहाणे, संतोष निवृत्ती राहाणे, लता कैलास राहाणे, निता शरद राहाणे, संतोष राहाणे यांची पत्नी (नाव माहिती नाही, चंदनापुरी), राधाकिसन आण्णासाहेब हासे, सुरेखा राधाकिसन हासे (राजापूर, संगमनेर) आदी 11 जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक फौजदार शिवाजी फटांगरे करीत आहेत.

Back to top button