नगर : बरसती श्रावण सरी, आरोग्याच्या वाढल्या तक्रारी! | पुढारी

नगर : बरसती श्रावण सरी, आरोग्याच्या वाढल्या तक्रारी!

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण जास्त असले, तरी नगर तालुक्याच्या दक्षिण भागात श्रावण सरींवर सरी कासळत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण आहे. पावसाच्या सरींमुळे हवामानातही मोठा बदल झाला आहे. बदलत्या वातावरणाने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. थंडी, ताप, सर्दी, खोकला आजाराने नागरिक बेजार असून, ग्रामीण भागातील दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत.

खेड्यापाड्यांत चिमुरड्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच ताप, सर्दी, खोकला या व्हायरल आजारांनी विळखा घातला आहे. यात लहान मुलांचे प्रमाण मोठे असल्याचे दवाखान्यांतील गर्दीतून दिसून येते. ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा वाढल्या असल्या, तरी सध्या फॅमिली डॉक्टरांचे ओपीडी कमी पडत आहे. तासभर थांबूनही नंबर लागणे मुश्किल बनले आहे. सर्दी, खोकल्याने सर्वांनाच ग्रासले आहे. त्यामुळे गावागावांतील दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढली आहे.

हवामान बदलाबरोबरच ग्रामीण भागात साफसफाईच्या नावाने बोंब आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. वस्त्याशेजारी घाणीचे साम्राज्य वाढले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचत असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. ओढे-नाले, रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेवर गवत वाढले आहे. रोजच सरीवर सरी कोसळत असल्याने सर्वत्र दलदल वाढली आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, थंडी या आजारांनी डोके वर काढले आहे . या व्हायरल आजारांमुळे लहानांपासून ज्येष्ठांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

रिमझिम पावसामुळे परिसरात दलदल वाढली आहे. त्यातच हवामानातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप, थंडी या आजारांचे प्रमाण वाढले आहे. व्हायरल आजार असल्याने एका व्यक्तीला झालेला आजार घरातील अन्य लोकांनाही होत आहे. यासाठी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांना आजारपणात शाळेत पाठविणे धोकादायक आहे. स्वतः प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल.

                                                                     – डॉ. नितीन तांबे, वाळकी, ता. नगर.

Back to top button