नगर : दीड वर्षात 954 बेपत्ता, लागेना थांगपत्ता!

नगर : दीड वर्षात 954 बेपत्ता, लागेना थांगपत्ता!

श्रीकांत राऊत

नगर : मुलगी, बहीण, आई बेपत्ता झाल्याने त्यांच्या शोधासाठी नातेवाईक पोलिसांचे उंबरे झिजवत आहेत. बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करूनही पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागत नाहीय. गत दीड वर्षात तब्बल पावणेपाच हजार स्त्री-पुरुष गायब झाले असून त्यातील पावणेचार हजार बेपत्तांना हुडकून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, अजूनही 954 बेपत्तांचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. नातेवाईक पोलिसांकडे शोधाची विचारपूस करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सद्यस्थितीत गायब असलेल्या 954 जणांमध्ये विवाहित महिला, तरुणींचे प्रमाण मोठे असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरच नव्हे, तर गाव-खेड्यांतूनही मुली, महिला, पुरूष बेपत्ता होत असल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. कौटुंबिक वाद, नैराश्य, आर्थिक संकट, धमकी अशी बेपत्ता होण्यामागील कारणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बेपत्ता झालेल्यांपैकी अनेक जण स्वत:हून परत आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, सद्यस्थितीत जिल्ह्यातील 954 बेपत्तामध्ये 472 महिला आणि 139 मुलींचा समावेश आहे.

त्यात काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. बेपत्ता मुले, मुली, महिला व पुरुषांच्या शोधासाठी पोलिस दलाकडून 'मुस्कान' मोहीम राबविली जात आहे. या मोहितेंर्गत बेपत्ता, अपहरण झालेल्या व्यक्तींचा शोध लावला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध लागेल, याची आस त्यांच्या कुटुंबीयांना आहे.

आमिषाला भुलून पलायन
कौटुंबिक वाद, नातेसंबंध, प्रियकराकडून लग्नाचे आमिष अशी कारणे आहेत. आमिषाला भुलून घरातून बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असून अपहरणाचे प्रकार तोकडे असल्याचे वास्तव पोलिस तपासात समोर आले. महिला, मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त असले, तरी त्यामागील कारणेही तशीच आहेत.

सात वर्षांनंतर मृत घोषित
बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध लागला नाही, तर सात वर्षांनंतर न्यायालय संबंधिताला मृत घोषित करते. बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीची प्रत न्यायालयात दिल्यानंतर न्यायालयाकडून मृत घोषितचे प्रमाणपत्र दिले जाते.

मुलींचे प्रमाण अधिक
जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2022 पर्यंत 654 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील 515 मुलींचा शोध पोलिसांना लावता आला.,तसेच बेपत्ता होणार्‍या मुलींमध्ये बहुतांश मुली अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांसोबत भांडण किंवा प्रियकाराच्या आमिषाला बळी पडून त्याच्यासोबत पळून गेल्याचे प्रकार अधिक आहे.
बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी दर महिन्याला आढावा घेण्यात येतो, तसेच मुस्कान मोहिमेंतर्गंत बेपत्तांचा शोध घेण्यात येत आहे.
-अनिल कटके, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नगर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news