नगर : सत्तापरिवर्तनामुळे ओव्हरफ्लोचे पाणी | पुढारी

नगर : सत्तापरिवर्तनामुळे ओव्हरफ्लोचे पाणी

कोंभळी, पुढारी वृत्तसेवा : सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी आले, हा राज्यातील सत्ता परिवर्तनाचा परिणाम आहे. मागील तीन वर्षांत या भागाला कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी समाधानकारक मिळाले नव्हते. परंतु, राज्यात सत्ता परिवर्तन होताच भोसाखिंडीद्वारे सीना धरणात पाणी सोडण्यात आले असल्याचे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले.

भोसा खिंडीद्वारे सीना धरणात सोडण्यात आलेल्या पाण्याचे घोगरगाव येथे आमदार राम शिंदे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, सरचिटणीस शेखर खरमरे, संपतराव बावडकर, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, अमृत लिंगडे, डॉ. रमेशचंद्र झरकर, अशोक खेडकर, दत्ता मुळे, अभिजित जवादे, संतोष कोरडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.शिंदे म्हणाले, ओव्हरफ्लोच्या पाण्याने या भागातील बहुतांशी पाझर तलाव भरले जाणार आहेत. येडगाव धरण ओव्हरफ्लो होताच डावा कालवा पूर्ण क्षमतेने सुरू केला आहे. त्यामुळे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या भागासाठी कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी देण्याबाबत आपण कुकडीचे कार्यकारी संचालक यांना सूचना दिलेल्या आहेत. कर्जत तालुक्यातील करपडी, परिटवाडी, काळेवाडी या भागाला देखील पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार शिंदे यांचा शेतकर्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Back to top button