‘मिशन झिरो ड्रॉप’चा अहवाल गुलदस्त्यात! नगर जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम कागदावरच? | पुढारी

‘मिशन झिरो ड्रॉप’चा अहवाल गुलदस्त्यात! नगर जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम कागदावरच?

नगर: शासनाच्या झिरो ड्रॉप आऊट मिशनद्वारे शाळाबाह्य मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी दि. 5 ते 20 जुलै दरम्यान जिल्ह्यात शिक्षण विभागाने अशा विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबविली. मात्र, 15 दिवस उलटूनही या मोहिमेचा परिपूर्ण असा अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त नसल्याने शिक्षण विभागाचे हे ‘मिशन’ नगरमध्ये रेंगाळल्याची चर्चा आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले आहे. कोरोना काळामुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता वर्तविली गेली. अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ अभियान हाती घेतले होते. त्याद्वारे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी शहरांसह, गावोगावी प्रत्येक कुटूंबाला भेट देण्यात आली. गावातून बाहेर गेलेल्या आणि गावामध्ये नवीन आलेल्या कुटुंबांची माहिती संकलित केली जाणार होती.

दि. 5 ते 20 जुलैदरम्यान ही विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. यात अ, ब, क आणि ड प्रपत्रात माहिती भरण्यात आल्याचे समजते. यात अ प्रपात्र गावातील प्रत्येक कुटूंबाचा तपशील, ब प्रपत्रात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा तपशील, क प्रपत्रात स्थलांतरित विद्यार्थी आणि ड प्रपत्रात गावात नवीन दाखल विद्यार्थ्यांच्या माहितीचा समावेश होता. मात्र, मोहीम कालावधी संपून 15 दिवस उलटून गेले, तरीही अद्याप जिल्ह्यात नेमके किती शाळाबाह्य मुले आढळली, तसेच स्थलांतरित किती, स्थलांतरण झालेली आकडेवारी किती, इत्यादीबाबतचा कोणताही स्पष्ट अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेला नाही. काही तालुक्यांचे अहवाल ऑनलाईन दिसत असले तरी ते अपूर्ण आहेत.काही अहवालात त्रूटी दिसत आहेत. पीडीएफ अहवालही अपूर्ण आहेत.

स्मरणपत्रांचेही पडले विस्मरण !

शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेचे अहवाल पूर्ण करून पाठविण्याबाबत शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सर्वच गट शिक्षणाधिकार्‍यांना स्मरणपत्र पाठविल्याची माहिती शिक्षण विभागाकडून समजली. मात्र, या स्मरणपत्राचे आता शिक्षणाधिकार्‍यांसह गटशिक्षणाधिकार्‍यांनाही विस्मरण झाले का, असा सवाल होत आहे.

Back to top button