नगर : सप्ताहातून फुलते जाती-भेदापलीकडे नेणारे तत्त्वज्ञान | पुढारी

नगर : सप्ताहातून फुलते जाती-भेदापलीकडे नेणारे तत्त्वज्ञान

झरेकाठी, पुढारी वृत्तसेवा : सर्व जाती, धर्माचा उद्धार करण्याचे सामर्थ्य सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी आपल्या अवतार कार्यात दाखविल्याचे सांगत, अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे आत्मशुद्धीचे ठिकाण आहे. जाती, भेदांच्या पलीकडे नेणारे हे तत्त्वज्ञान आहे. सामान्य माणसाचा उद्धार करणारे हे पवित्र ठिकाण आहे, अशी अमृतवाणी महंत रामगिरी महाराज यांनी केली.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे सातवे कीर्तन पुष्प गंफताना महंत रामगिरी महाराज तमाम जन सागराशी हितगुज करीत करताना अभंगाचे निरुपण करीत होते. संत जोग महाराज व संत तुकाराम महाराज खेडकर आदी महाराजांनी भाविकांना अध्यात्म मार्गाला लावण्याचे काम केले. गगनगिरी महाराज यांनी पंढरपुरात सातशे पोते बंदी गाळून सप्ताह साजरा केला. बैलगाडीतून कुडेवाडी ते पंढरपूरपर्यंत त्यांनी बंदीची पोते वाहिली, असे सांगत असा सप्ताह परत होईल की नाही, अशी शंका असल्याचे सांगत वर्तमानात, ‘न भूतो ना भविष्यती सप्ताह’ असे म्हणणे कितपत योग्य आहे, असा सवाल महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थित केला.

सोमवारी सातव्या दिवशी लाखो भाविकांनी कीर्तन, दर्शन व आमटी- भाकरीचा आस्वाद घेतला. दुपारी 1 वाजता महंत रामगिरी महाराज यांनी कीर्तनाचे सातवे पुष्प गुंफुले. यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा,
मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला..
इवलेसे रोप लावियले द्वारी..
तयाचा वेलू गेला गगनावरी.. मनचीये गुंती भूक गुंफियाला शेला..
बाप- रखमादेवीवर विठ्ठल अर्पिला…!
हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला.

मान्यवरांची उपस्थिती…

याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते, आ.राधाकृष्ण विखे पा. यांनी दर्शन घेतले. माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री अण्णासाहेब म्हस्के, आ. सुधीर तांबे, श्रीसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष, ना. आशुतोष काळे, विश्वात्मक जंगली महाराज ध्यान केंद्राचे महंत परमानंद महाराज, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, समाधान महाराज शर्मा, माऊली संस्थानचे सद्गुरु महाराज, मधु महाराज, सेवागिरी महाराज, आ. लहू कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, पोपटराव वाणी, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, विवेक कोल्हे, नंदकुमार सूर्यवंशी, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष रोहम, गाढे, संभाजी रक्ताटे, राजेश परजणे, कडूभाऊ काळे, कोपरगाव पंचायत समिती माजी सभापती मच्छिंद्र टेके, शिवाजी वक्ते, रोहिदास होन, सुंदरगिरी महाराज, माऊली महाराज, भाऊसाहेब जपे, दिलीप सदाफळ, दशरथ महाराज, भाऊसाहेब महाराज मगर, संभाजी महाराज मगर, योगेश महाराज कांदळकर आदींसह भाविक भक्तांचा जनसागर उपस्थित होता.

महंत रामगिरी महाराज म्हणाले, संत गंगागिरी महाराज यांनी चारी वर्णांसाठी अन्नछत्र उघडले होते. सर्व जाती-धर्माचा उद्धार करण्याचे सामर्थ्य संतांमध्ये आहे, असे सांगत, सप्ताह आयोजकांचे कौतुक करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, पहिल्या दिवशी मिरवणुकीस दोन लाख भाविकांनी हजेरी लावल्याने जणू जनसागरच लोटल्याचे विलोभनिय चित्र दिसले.

भक्ती ९ दरवाजांचा बंगला

महंत रामगिरी महाराज म्हणाले, संत कबीर महाराजांनी भक्तीबद्दल नऊ दरवाजाचा हा बंगला असल्याचे सांगत, त्यात श्रवण इंद्रिय सर्वश्रेष्ठ आहे. गुरु- शिष्य परंपरा मोठी आहे. गुरु- शिष्य कानात मंत्र सांगतात. कारण अयोग्य व्यक्तीने त्याचे ग्रहण करू नये, ही त्यामागची भूमिका असते. शब्दशक्ती मोठी आहे. म्हणूनच शिवी दिल्यावर राग येतो, तर कौतुक केल्यावर गुदगुल्या होतात, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. श्रवण व स्पर्श शक्ती प्रभावी असते. तसे ईश्वराचे चिंतन केल्याने आत्मसाक्षात्कार व शांतीचा लाभ होतो. सद्गुरु शिष्याकडे चित्त मागतात. संसारात वित्त तर परमार्थात चित्त लागते, असे म्हणत महंत रामगिरी महाराज यांनी अंतःकरण हे शरीराचे सार असल्याचे स्पष्ट केले.

वाईट विचारांच्या माणसाशी संपर्क टाळावा, असा मौलिक सल्ला देताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, सज्जनही दुर्जनांच्या संगतीत राहिल्यास त्याला दुर्गुण लागतात. विद्युत ऊर्जा कोणाला माफ करीत नाही. ती अनेकांना मृत्यूला कारणीभूत होते. नको तेथे स्पर्शाचा हा दुष्परिणाम आहे. सजनांचा स्पर्श चांगला तर दुर्जनाचा स्पर्श अंधःपतनाला कारणीभूत होतो, मात्र सद्गुरु आपली ऊर्जा शिष्याला मुक्तहस्ते देतात, म्हणून सद्गुरुला अनन्यभावे शरण जावे, असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले. आज सप्ताहाची सांगता होणार आहे.

गर्दीच-गर्दी दाटली चोहीकडे..!

सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त अ. नगर जिल्ह्यासह नाशिक, औरंगाबाद, जळगाव जिल्ह्यांसह राज्य व देशातील भाविकांचा जनसागर दाटत असल्याने गर्दीच-गर्दी चोहिकडे, दिसत आहे. दरम्यान, आज सांगतेनिमित्त गर्दीचा उच्चांक होणार आहे..!

Back to top button