नगर : हल्लेखोरांचे जिहादी कनेक्शन पोलिसांनी तपासावे | पुढारी

नगर : हल्लेखोरांचे जिहादी कनेक्शन पोलिसांनी तपासावे

नगर, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांचे समर्थन केल्यामुळे कर्जतमधील व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याबाबत खोट्या कहाण्या रचल्या जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास करावा. नुपूर शर्मांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाला असून, पोलिसांनी हल्लेखोरांचे जिहादी कनेक्शन तपासावे, तसेच हिंदूंना टार्गेट केले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

हल्ल्यातील जखमी सनी ऊर्फ प्रतीक पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे व आमदार गोपीचंद पडळकर सोमवारी (दि.8) नगरमध्ये आले होते. रूग्णालयात प्रतीक पवार यांची भेट घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी आ. राणे व आ. पडळकर यांनी हल्ला प्रकरणाच्या तपासासंदर्भात चर्चा केली. या प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी आ. राणेंनी केली.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना आ. राणे म्हणाले की, नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने हा हल्ला झाला आहे. या प्रकरणाला वेगळे वळण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांकडून हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे दर्शविले जात आहे. पोलिसांनी कोणाच्याही दबावात न येता या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच हल्लेखोरांचे जिहादी कनेक्शन पोलिसांनी तपासावे, असे राणे यावेळी म्हणाले. आता हिंदुत्वाला मानणारे सरकार राज्यात आता हिंदुत्वाला मानणारे सरकार असून, हिंदूंना अशा पद्धतीने ‘टार्गेट’ केले जात असेल तर आम्ही शांत बसणारे नाही, असा इशारा आ. राणेंनी दिला. तसेच, आता सरकार बदलले असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. या प्रकरणावर त्यांचे लक्ष असल्याचेही राणे म्हणाले.

तपास योग्य दिशेने – मनोज पाटील

कर्जत हल्ल्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. हल्ल्यामागे पूर्वीचे वाद आणि नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरील पोस्टचे एक कारण असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, बरेच पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून, या हल्ल्यामागे काही षड्यंत्र आहे का? या दिशेने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

खोटे गुन्हे दाखल; पडळकरांचा आरोप

पोलिस अधीक्षक पाटील यांच्याशी चर्चा करत असताना, आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्जतमधील पोलिस निरीक्षक कोणावरही खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा गंभीर आरोप केला. याबाबत माहिती घेणार असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

Back to top button