चांदेकसारे : ‘जीव धोक्यात घालून कॉलेजला चाललो आम्ही..!’ जाम नदीच्या पुलावर पाणी आल्याने संतप्त विद्यार्थ्यांचे बोल! | पुढारी

चांदेकसारे : ‘जीव धोक्यात घालून कॉलेजला चाललो आम्ही..!’ जाम नदीच्या पुलावर पाणी आल्याने संतप्त विद्यार्थ्यांचे बोल!

चांदेकसारे; पुढारी वृत्तसेवा: मुसळधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील घारी-चांदेकसारे गावचा संपर्क सुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. डाऊच बुद्रूक येथे वाहने अडकून पडल्याने घारीचे कॉलेजचे काही विद्यार्थी माघारी परतले. दरम्यान, मुसळधार पावसामुळे जाम नदीच्या पुलावर पाणी आल्याने घारी येथील कॉलेजचे विद्यार्थी अक्षरशः जीव धोक्यात घालून घारीहून चांदेकसारे गावाकडे पायी निघाले. काहींनी ‘जीव धोक्यात घालून कॉलेजला चाललो आम्ही,’ म्हणत संतापाचे बोल ऐकविले.

दरम्यान, घारी येथील जामनदीवरील पुरातन पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी घारीसह डाऊच बुद्रूक व चांदेकसारे ग्रामस्थांनी केली आहे. रविवारी रात्री 8 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहाटे 4 वाजेपर्यंत पाऊस सुरूच राहिल्याने नदी, नाले भरून वाहू लागले. पिकांमध्ये पाणी साचले. घारी-चांदेकसारे नदीवर बांधलेल्या पुलावरून पाणी वाहू लागले. घारी येथील पूल जुना झाला आहे. या पुलाची उंची कमी आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे डाऊच बुद्रूक व घारीगावचा चांदेकसारे येथे जाण्यास संपर्क तुटला आहे. साहजिकच ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचे संतप्त चित्र दिसत आहे.

वाहने बंद पडली..!
डाऊच बुद्रूक येथे वाहने अडकून पडल्याने शाळेतील विद्यार्थी माघारी परतले. पाण्यामुळे चारचाकींसह मोटारसायकल बंद पडल्या. चांदेकसारेहून कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले.

 

Back to top button