नगर : परीक्षा झाल्याशिवाय विद्यार्थ्यांवर कारवाई नको | पुढारी

नगर : परीक्षा झाल्याशिवाय विद्यार्थ्यांवर कारवाई नको

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गोंधळाची सध्या विद्यापीठ स्तरावर चौकशी सुरू असून 400 – 500 विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यापीठाने विद्यार्थ्यांची मुख्य स्पर्धा परीक्षा झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी पालक वर्गाकडून होत आहे.

गेल्या वीस – पंचवीस वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडून विद्यापीठाची बदनामी करण्यासाठी कोणती शक्ती कार्यरत आहे का? असाही प्रश्न विचारला जात आहे. दहा जिल्ह्यांचा विस्तार असणार्‍या महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदवीत्तर, अभियांत्रिकी, कृषी महाविद्यालयांमध्ये राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात, तसेच पीएचडी देखील मिळवतात. हे करीत असताना हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास करतात. विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शरद, शिशिर, वसंत चार होस्टेल असून प्रत्येकी 96 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आहे.

प्रत्येक होस्टेलला एक मॉनिटर असून चार होस्टेलला एक रेक्टर आहे. याचे व्यवस्थापन सहयोगी अधिष्ठाता द्वारे संचलित केले जाते. होस्टेल मध्ये सध्या विविध जिल्ह्यांतील कृषी शास्त्र व अभियांत्रिकीचे पदव्युत्तर व पीएचडीचे शिक्षण घेणारे जवळपास 400 ते 500 विद्यार्थी होस्टेलमध्ये राहत असल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यात अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थी यावरून गोंधळ झाला होता. त्याची माहिती प्रसार माध्यमांमध्ये वेगाने पसरली. या विषयावर सध्या दोन जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

अधिक माहिती घेतली असता गेल्या 25 वर्षांपासून नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे येथील महाविद्यालयातील अनेक पदव्युत्तर व पदवी घेणारे विद्यार्थी शिक्षण घेत असताना विद्यापीठातील होस्टेलचा आधार घेतात. विद्यापीठातील बहुतांशी विद्यार्थी हे कोल्हापूर , सांगली, सातारा, पुणे, नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी आहेत हे विशेष आहे. असे असताना गोंधळाचा प्रकार आताच कसा घडला? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसून येत आहे.

सध्या विद्यार्थ्यांची चौकशी समिती चौकशी करीत असून जवळपास 400 – 500 विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या प्रीलियम झालेल्या आहेत. आता पुढील महिन्यात मुख्य परीक्षा होणार आहेत. त्याची तयारी सर्व विद्यार्थी करत आहेत. असे असताना झालेल्या या कलुषित व गढूळ वातावरणाचा व कृषी विद्यापीठाची बदनामी डाव कोणती तरी शक्ती करत आहे? असा प्रश्न विद्यार्थी, पालक वर्ग, शेतकरी, विद्यापीठ वर्तुळात सध्या विचारला जात आहे.

Back to top button