नगर : नान्नजच्या विश्रामगृहाची मोठी दुरवस्था | पुढारी

नगर : नान्नजच्या विश्रामगृहाची मोठी दुरवस्था

नान्नज, पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नान्नज येथील विश्रामगृहाच्या परिसरात काटेरी वनस्पतींचे साम्राज्य आले असून, या विश्रामगृहाची दारे, खिडक्या तुटल्याने मोठी दुरवस्था झाली आहे. या विश्रामगृहाला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विश्रामगृहाची त्वरित साफसफाई करून येथील देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचार्‍याची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नान्नज येथे जामखेड-करमाळा रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अनेक वर्षांपूर्वी येथे विश्रामगृहाची इमारत बांधण्यात आलेली आहे. या विश्रामगृहाला बाहेरच्या बाजूने संपूर्ण दगडी बांधकामाचे वॉल कंपाऊंड असून, या दक्षिण दिशेकडून मोठे प्रवेशद्वार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून परिसरात उगवलेल्या काटेरी वनस्पतींमुळे हे विश्रामगृह गावात आहे की जंगलात आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. येथील विश्रामगृहाच्या देखभालीसाठी यापूर्वी कायमस्वरूपी कर्मचार्‍याची नेमणूक होती. मात्र, तीन-चार वर्षांपासून एकाही कर्मचार्‍याची नेमणूक नसल्याने हे विश्रामगृह सध्या बेवारस पडले आहे.

शासकीय अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्यांना गावात कोठेही बसण्याची व्यवस्था नाही. त्यांच्यासाठी गावात विश्रामगृह उपलब्ध असताना, केवळ दुरवस्था झाल्यामुळे सध्या हे विश्रामगृह उपयोगात येत नाही.
त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष देऊन या विश्रामगृहाची साफसफाई करून येथील देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, याप्रश्नी सामाजिक संघटनाही आक्रमक आहेत.

विश्रामगृह बंद, मग खर्च कशाला?

चार वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून या विश्रामगृहाची तात्पुरती डागडुगी, रंगरंगोटी करण्यात आली. केवळ रंगरंगोटी केल्यामुळे हे विश्रामगृह सध्या शोभेची वास्तू बनले आहे. हे विश्रामगृह बंद असेल तर मग लाखो रुपये खर्च करता कशाला, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

Back to top button