कुकाणा : आम्ही शाळेत जायचं कसं…? चिमुरड्यांची तारेवरची कसरत | पुढारी

कुकाणा : आम्ही शाळेत जायचं कसं...? चिमुरड्यांची तारेवरची कसरत

कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील खुणेगाव येथील रस्त्याचे दुरूस्तीचे काम रखडल्याने, पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जात येत नसल्याने, शाळा बुडत आहे. शेतकर्‍यांनाही शेतमाल विक्रीसाठी नेता येत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे रस्ता दुरूस्तीसाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. खुणेगाव ते पिचडगाव हा शासकीय रस्ता असून, ग्रामपंचायतीमार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे भरावीकरण करून दुरुस्ती करण्यात आली आहे.

परंतु, एका शेतकर्‍याने काम बंद पाडल्याने रस्ता दुरुस्ती रखडली आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना या रस्त्याने शाळेत जाता येत नाही. शाळेला गैरहजर राहाण्याची वेळ येत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच, शेतकर्‍यांचे डाळिंब, कांदे तसेच इतर शेतमाल विक्रीसाठी बाजारात नेता येत नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.

त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, प्रशासनाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा योगेश कदम, गणेश कदम, जालिंदर पंडित, सुखदेव शिंदे, हरिभाऊ पंडित, वसिम शेख, उत्तम पंडित, शेखनूर शेख, आयुब शेख, मीराबाई शिंदे, आशाबाई शेख, रुक्सार शेख यांनी दिला आहे.

स्वखर्चाने रस्ता दुरुस्तीची तयारी
हा सरकारी रस्ता असूनही अनेक वेळा मागणी करून कुठल्याही लोकप्रतिनिधीने दुरूस्तीकडे लक्ष दिले नाही. शेतकरी, विद्यार्थी, आजारी व्यक्ती यांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन आम्ही सर्व शेतकरी स्वखर्चातून रस्ता दुरुस्त करण्यास तयार आहोत. त्यासाठी तहसीलदारांनी स्वतः तेथे उपस्थित रहावे, अशी मागणी शेतकरी योगेश कदम यांनी केली आहे.

Back to top button