धागा धागा… अखंड विणू या उन्नतीचा!

धागा धागा… अखंड विणू या उन्नतीचा!
Published on
Updated on

अलताफ कडकाले

नगर : हातमाग कला आणि त्यातून विणल्या गेलेल्या सुंदर वस्त्रांचे धागे शोधत गेलो, तर आपल्याला इतिहासाशी त्यांची देखणी नाळ जोडलेली दिसते. मात्र, नगरमधील हा संदर व्यवसाय काळाच्या ओघात नामशेष झाल्यात जमा झाला..पारंपरिक कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली, तर प्राचीन परंपरा टिकवणं, नव्याने रुजवणं आणि जगभरात त्याच दिमाखात पोहोचवणं शक्य आहे. नगरमधील विणकर समाजाची बेरोजगारी दूर होण्यासाठी स्वावलंबी जीवन जगण्याचे धडे देण्याची गरज आहे. यासाठी आजच्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त 'धागा धागा अखंड विणू या..उन्नतीचा' असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

नगर शहरात एके काळी मोठ्या प्रमाणात हातमाग होते. येथील हातमागचे कापड राज्यातील मोठी व प्रमुख बाजारपेठ होती. त्यामध्ये प्रामुख्याने साळी, पदमःसाळी, कोष्टी, तसेच इतर राज्यातून आलेल्या विणकर समाज होता. आता, हातमाग, पावारलूम नगरमधील बंद झाले असून, बोटावर मोजण्या इतके आहेत, तरी आजही मोठ्या प्रमाणावर हा समाज नगरमध्ये आहे. या निमित्ताने समाजाच्या उन्नत्तीसाठी काही तरी उपक्रम राबवून समाजचा बंद पडलेला हा व्यवसाय पावरलूमच्या माध्यमातून पुन्हा शहरात सुरू झाला, तर विणकर समाजाची बेरोजगारी कमी होईल. तसेच, हा समाज पुढे गेला पाहिजे अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली.

नगरमधील विणकर व्यवसायाला एक इतिहास असून, पुणे – मराठवाड्याला जोडणारे प्रवेशद्वार म्हणून नगरकडे पाहिले जाते, म्हणूनच निजामाच्या काळापासून विणकर समाज नगरमध्ये स्थिरावला. एके काळी शमी गणपती समोर एक हातमाग चाले, नगर व भिंगार सारख्या उपनगरात अनेक हातमाग होते. काळाच्या ओघात नगरमधले हातमाग एक-एक करून बंद झाले, तर भिंगारमधील हातमागातील काही स्वयंचलित यंत्रांमध्ये परिवर्तित झाले. हातमाग व्यवसाय देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक. देशभरातील कोट्यावधी लोकसंख्या विशेषत: ग्रामीण भागातील लोक या व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत.

हातमाग दिन 7 ऑगस्ट
7 ऑगस्ट हा दिवस हातमाग दिवस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली जाहीर केला. तेव्हापासून शासनाने विणकरांना प्रशिक्षण देऊन या व्यवसायासाठी लागणारे माग व इतर साहित्य, पत्राशेडसाठी आर्थिक मदत सुरू केली. या योजनेचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. अनेक कुटुंबं आता स्वावलंबी जीवन जगत आहेत. शेतीनंतर वस्त्रोद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत दुसर्‍या स्थानावर आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जवळजवळ 37 टक्के वाटा कापड उद्योगाचा आहे. एकेकाळी देशात हातमागावर विणलेले कापड सर्वत्र प्रसिद्ध होते. या कपड्याला जागतिक बाजारपेठेत खूप मागणी असायची. जसा काळ बदलत गेला, तशा नागरिकांच्या आवडीनिवडी बदलल्या. त्याप्रमाणे हातमागावर नावीन्यपूर्ण डिझाईनसह कपड्याला बाजारपेठ मिळवून देण्यात आली. सध्या या व्यवसायावर उदरनिर्वाह करणारी कुटुंबे संकटात आली आहेत.

विणकाम शटलने वाढला वेग
सुरुवातीच्या काळात विणकाम करून वस्त्र निर्माण करताना, हाताच्या सहायाने धोटे फेकावे व दुसर्‍या हाताने झेलावे लागत होते. या काळात एक नववारी साडी तयार करण्यासाठी जवळपास 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागत होता. पुढे विणकाम शटल आले. या पद्धतीमध्ये धोटे एकीकडून दुसरीकडे वेगाने धावत असे. त्यामुळे किमान दररोज एक विणकर मजूर एक साडी विणत होता. परंतु, बदलत्या काळाबरोबर बारिक सुताच्या वस्त्रांची मागणी होऊ लागली आणि विणकाम व्यवसायातही बदल करावा लागला. 40 बाय 40, 60 बाय 60, 80 बाय 80 या प्रकारच्या सुतापासून काठपदर असलेली साडी बनवण्यात येऊ लागली. नगरच्या विणकाम व्यावसायिकांनी आपल्या घरी, कारखान्याजवळ साडी सेंडर सुरू केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news