टाकळीढोकेश्वर : पोलिस ठाण्याला प्रतीक्षा उद्घाटनाची! | पुढारी

टाकळीढोकेश्वर : पोलिस ठाण्याला प्रतीक्षा उद्घाटनाची!

टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य गृह विभागाकडून शासन निर्णय जारी होऊन तब्बल अडीच वर्षे उलटल्यानंतरही, पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथील मंजूर नवीन पोलिस ठाणे लालफितीमध्ये अडकलेले आहे. त्याच्या उद्घाटनाला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. अपर पोलिस महासंचालक (नि.व.स.) यांच्या दि.28 ऑगस्ट 2019 च्या पत्रान्वये टाकळी ढोकेश्वर येथे नवीन पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळातून या पोलिस ठाण्यास अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

या अनुषांगाने शासनाने निर्णय घेऊन टाकळी ढोकेश्वर येथे 43 कर्मचार्‍यांचे नवीन पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी अडीच वर्षापूर्वी मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये एक सहायक पोलिस निरीक्षक, 2 पोलिस उपनिरीक्षक, 3 सहायक पोलिस उपनिरीक्षक, 6 पोलिस हवालदार, 9 पोलिस नाईक, 22 पोलिस शिपाई, अशा एकूण 43 पदांचा समावेश आहे. उपलब्ध साधनसामग्रीतून पोलिस ठाणे सुरू करण्यास अडीच वर्षांपूर्वी मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र, जिल्हा पोलिस प्रशासनाकडून आजतागायतही हे पोलिस ठाणे सुरू करण्याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे टाकळी ढोकेश्वर येथील पोलिस ठाणे अजून किती काळ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अपघात अन् गुन्ह्यांचे प्रमाण जास्त
पारनेर तालुका क्षेत्रफळाने मोठा असून, नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. या पोलिस ठाण्याअंतर्गत 35 ते 40 गावे येत आहेत. गुन्ह्यांचेे वाढते प्रमाण पाहता अनेक दिवसांच्या मागणीला यश आले खरे. पण, अडीच वर्षे उलटूनही पोलिस ठाणे उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पोलिस ठाणे कार्यान्वित करा : धुमाळ
टाकळी ढोकेश्वर परिसरात विविध शैक्षणिक संस्था, महामार्गावर टोल नाका आहे. पोलिस ठाण्यामुळे फोपावलेल्या गुन्हेगारीला आळा बसून ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना सुरक्षा मिळू शकते. अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील यांच्याशी चर्चा करून प्रलंबित पोलिस ठाणे तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी किसन धुमाळ यांनी केली आहे.

Back to top button