कुकाण्यात दवाखाने हाऊसफुल्ल ! पण प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मात्र सुविधांची वानवा | पुढारी

कुकाण्यात दवाखाने हाऊसफुल्ल ! पण प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मात्र सुविधांची वानवा

कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : प्रतिकूल हवामानामुळे कुकाणा परिसरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे घरोघरी रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. सध्या परिसरातील दवाखाने हाऊसफुल्ल झाले असून, उपचारासाठी बेडच शिल्लक नसल्याचे चित्र आहे. कुकाणा आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना साथीच्या आजारांचे कुठलेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे केंद्राच्या अखत्यारित येणार्‍या अनेक आरोग्य उपकेंद्रांमध्ये कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप अनेक गावचे ग्रामस्थ करीत आहेत.

तेथे असलेले कर्मचारी आरोग्य उपकेंद्रात उपस्थित राहत नसून रुग्णांना सरकारी औषधोपचार मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांना उपचारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यावरून आरोग्य यंत्रणेला कोणाचाही धाक नसल्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांची मुजोरी वाढलेली दिसून येते. परिसरातील देवगाव, तरवडी, जेऊर, चिलेखनवाडी, देवसडे, तेलकुडगाव ,अंतरवाली, पाथरवाला, शिकारी नांदूर, भेंडा, नजीक चिंचोली या गावांमध्ये सर्दी-ताप -जुलाब व खोकल्याच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ आठ दिवसांपासून झाली आहे. यामध्ये लहान मुलांचा जास्त मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

प्रत्येक रुग्णांचे वेगवेगळ्या आजारांचे निदान होत असल्याने रुग्णांना दुसराच काही आजार झाल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर तपासण्या आणि चाचण्या केल्यास त्याचाही आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत आहे. त्यामुळे सावधान राहण्याच्या सल्ला डॉक्टर देत आहेत. आरोग्य विभागाने यावर तत्काळ पाऊल उचलावे, अशी मागणी नागरिक आहेत.

दरम्यान, पावसाळ्यामुळे कुकाणा परिसरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रत्येक घरात रुग्ण दिसत आहेत. साथीचे आजोरांवर आरोग्य विभागाकडून कुठल्याही उपाययोजना केलेल्या दिसत आहेत. खासगी दवाखान्यांतही कधी-कधी वेळेवर उपचार होत नाहीत. त्यामुळे रुग्ण चांगलेच वैतागले आहेत. कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेने सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात, तसेच केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना समज द्यावी, अशी मागणीही नागरिकांमधून केली जात आहे. सध्या प्रतिकूल हवामान असल्याने साथीचे आजार बळावले आहेत.

मुख्यालयी राहण्यास नकार
आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी आपल्या मुख्यालयी राहणं कायद्याने बंधनकारक असताना देखील कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या उपकेंद्रातील अनेक डॉक्टर, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. बहुतेक सर्वजण बाहेरगाहून ये-जा करीत असल्याने रात्री अपरात्री रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वरिष्ठ अधिकार्‍याने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची नागरिकांतून भावना व्यक्त होत आहे

Back to top button