जामखेडमध्ये 25 हजार तिरंगा ध्वज फडकणार | पुढारी

जामखेडमध्ये 25 हजार तिरंगा ध्वज फडकणार

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या अमृत पंधरवडा अभियान व हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ मोठ्या धडाक्यात तालुक्यातील फक्राबाद येथूे जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सरपंच विश्वनाथ राऊत, कार्यकारी अभियंता माने, तालुका आरोग्य अधिकारी सुनील बोराडे, उज्जवला बेल्हेकर, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी भजनावळे, ग्रामसेवक अनिल आटोळे, तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी येरेकर म्हणाले की, जामखेड हा अवर्षणप्रवण तालुका आहे. या तालुक्यातून भरपूर मजूर ऊसतोडण्यासाठी स्थलांतर करीत असतात. ऊसतोडणी कामगारांसाठी शासन ज्या योजना आखत आहे, त्याचा फायदा कामगारांनी घ्यावा. त्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ऊसतोडणी कामगारांना ओळखपत्र द्यावे.

तालुक्यात अमृत पंधरवडा अभियानांतर्गत 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील 30 प्राथमिक शाळा व 10 अंगणवाड्यांना जैविक संरक्षक भिंत बांधलीे जाणार आहे. यामध्ये शाळा/अंगणवाडीच्या सभोवती झाडे लावून झाडांची संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. तसेच 15 ऑगस्टपर्यंत तालुक्यातील 5000 ऊसतोडणी कामगारांना ओळखपत्र दिले जाणार आहे. या ओळ्खपत्रांच्या माध्यमातून, त्यांना मुलांसाठी हॉस्टेल व इतर योजनांचा लाभ घेता येईल. सर्व मजुरांनी ग्रामपंचायतींकडून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

तालुक्यातील 5 गावांमध्ये 100 टक्के कुटुंबाना वैयक्तिक नळजोडणी देऊन हर घर जलचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. त्याचबरोबर बाला संकल्पनेनूसार अंगणवाडी व शाळांचा भौतिक विकास केला जाणार आहे. तालुक्यातील सर्व विधवा व एकल महिलांची नोंदणी 15 ऑगस्टपर्यंत केली जाणार आहे. या माध्यमातून वंचित विधवा व एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे शक्य होणार आहे. तसेच सर्व शाळा व महाविद्यालयांतील एकल विद्यार्थ्यांचीही नोंदणी केली जाणार आहे.

आई किंवा वडील हयात नसतील किंवा संगोपन करीत नसतील, तर त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येईल.60 वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस देणे, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा तिसरा टप्पा सर्व लाभार्थ्यांना देणे या बाबीही 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

ग्रामपंचायतींमध्ये मिळणार तिरंगा ध्वज
येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत 25000 कुटुंबांना ध्वज देण्यात येणार असून, तालुक्यातील सर्व संस्था, घरांवर ध्वज फडकवला जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ध्वज उपलब्ध केले असून, 25 रु मध्ये नागरिकांनी ते खरेदी करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

Back to top button