राहुरीतील ‘त्या’ आरोपींना सात दिवसांची कोठडी
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बारागावनांदूर येथे ड्रग्ज सदृश अंमली पदार्थ सापडल्याप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यासह परिसरात अंमली पदार्थांची तस्करी सुरू होती. श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, राहुरी येथील पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, अन्न, औषध प्रशासन पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले यांनी एका पत्र्याच्या गाळ्यात धाड टाकली. त्या ठिकाणी काम वासना वाढविणार्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशा आणणार्या गोळ्या तसेच ड्रग्ज सारखा अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
सुमारे 33 लाख 7 हजार 946 रूपयांचा हा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेबाबत औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन विभाग, अ. नगर येथील ज्ञानेश्वर मोहन दरंदले यांच्या फिर्यादीवरून जमील महेबूब शेख (वय 22, रा. जूना कनगर रोड, राहुरी), अक्तर चाँद शेख (वय 21, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थांची तस्करी कोठे- कोठे सुरू होती. या तस्करीत कोण सहभागी आहेत, याचा शोध पोलिस पथकाकडून सुरू असल्याने तपासाकडे लक्ष लागले आहे.

