पाथर्डी : पोलिसांना दुचाकीने फरफटत नेऊन मारहाण | पुढारी

पाथर्डी : पोलिसांना दुचाकीने फरफटत नेऊन मारहाण

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील माणिकदौंडी येथील आरोपीला न्यायालयाचे पकड वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांना फरफटत नेऊन लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाथर्डी पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल आकाश अशोक चव्हाण व कॉन्स्टेबल भारत अंगरखे हे दोघे वॉरंट बजावणीसाठी जात होते.

तेव्हा त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट माळशिरस यांच्याकडील वॉरंटमधील आरोपी अफजल छोटेखा पठाण (रा. माणिकदौंडी, ता. पाथर्डी) हा त्याच्या घराजवळील हॉटेलवर आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर ते त्यास वॉरंट बजावण्यासाठी गेले असता, तो विनाक्रमांकाच्या दुचाकीवर बसून पळून जाऊ लागला. हेडकॉन्स्टेबल चव्हाण यांनी त्याच्या दुचाकीला मागून पकडले असता, पठाण याने त्यांना वीस ते पंचवीस मीटर फरफटत नेले. त्यामध्ये त्याचे कपडे फाटले व मार लागला.

कॉन्स्टेबल अंगरखे हे चव्हाण यांच्या मदतीला आले असता, पठाण याचा मुलगा अतिक अफजल पठाण हा हातामध्ये लाकडी दांडा घेवून पळत आला. अफजलचा भाऊ अशीर छोटेखा पठाण हा देखील आला. नंतर तेथे आलेल्या रमीज अकबर पटेल (रा. माणिकदौंडी) व एका अनोळखी इसमाने पोलिसांना धक्काबुक्की केली. आतिक पठाण, आशीर पठाण यांनी लाकडी दांड्याने हेडकॉन्स्टेबल चव्हाण यांना मारहाण केली. हे सर्वजण अफजल पठाण यास दुचाकीवर बसवून तेथून निघून गेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button