शेवगाव : साखरसम्राटांची तिसरी पिढी आखाड्यात! | पुढारी

शेवगाव : साखरसम्राटांची तिसरी पिढी आखाड्यात!

रमेश चौधरी : शेवगाव : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील मातब्बर साखरसम्राट घुले, राजळे आणि ढाकणे या प्रस्थापित घराण्यांतील तिसर्‍या पिढीतील तरुणांनी राजकीय आखाड्यात पदार्पण केले आहे. या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील व मतदारसंघातील राजकीय सूत्रे तरुणाईच्या हाती देण्याचा प्रयत्न असल्याने आगामी निवडणुकीत आपल्या घराण्याचा प्रगल्भ वारसा ते कसा चालवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात घुले, राजळे, ढाकणे तीन साखरसम्राटांची राजकीय जुगलबंदी सर्वश्रूत आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यानंतर आमदार मोनिका राजळे या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत.

मात्र, अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्याकडे सत्तेचा राजयोग आला नाही. पक्षात देखील साखरसम्राटांची मक्तेदारी असल्याने भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असाच सत्तासंघर्ष या मतदारसंघात होत राहिला. या सत्तासंघर्षात इतर कोणी उदयाला येऊ नये, यासाठी एकत्रित प्रयत्न केले गेले.
घुले, ढाकणे, राजळे घराण्याच्या राजकारणात यांची तिसरी पिढी डॉ.क्षितिज घुले, ऋषिकेश ढाकणे, तर राजळेंची चौथी पिढी कृष्णा राजळे यांच्या रुपाने राजकारणात सक्रिय झाले आहेत. आता तालुक्यातील राजकारणातील दृष्टीने महत्त्वाचे असलेले राजकीय निर्णय घेताना प्रगल्भता जाणवत आहे. आगामी नगरपरिषदेच्या दृष्टीने शेवगाव शहरातील गल्लीबोळात, व्यापारी पेठेत व वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेली ‘चाय पे’ चर्चा औत्सुक्याचा विषय ठरू लागली आहे. कामाची पद्धत, सर्वस्तरातील मित्र, यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यांतील युवकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होत आहे.

आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या निवडणुकांत या तीनही घराण्यांतील पुढच्या राजकारणाची सूत्रे या तिघांच्या रुपाने उच्चशिक्षित तरुणाईच्या हातात आल्याने दोन्ही तालुक्यांतील युवकांसाठीही संधीचे नवीन दार उघडणार आहे. त्यामुळे थेट प्रश्नांंशी भिडणार्‍या या तरुणांच्या राजकारणातील सहभागाने भविष्यातील निवडणुका व राजकारण आता इतर मुद्यावरून थेट विकासाच्या मुद्यावर येईल, असा आशावाद निर्माण झाला आहे.

डॉ. क्षितिजची नाळ पंचायत राजला जोडलेली
पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, बी.ई. कॉम्पुटर, एम.बी.ए.,पीएचडी अशा उच्च विद्याभ्यास करून सहा वर्षे पुणे येथे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करताना बचत गटाचे कार्य, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा अशा सामाजिक कार्यातून त्यांनी गत पंचायत समिती निवडणुकीत राजकीय आखाडा गाठला. लगेचच सभापतिपदाच्या रुपाने तालुक्यातील पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्चपद मिळविले. त्यांच्या कार्याने पंचायत समितीस दोन वेळेस पंचायत राज राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. धरणग्रस्त, पूरग्रस्त, कोरोना महामारीत त्यांची उल्लेखनीय कामगिरी झाली. घुले घराण्यांचा राजकीय व सामाजिक वारसा, त्यांचे मामा माजी मंत्री जयंत पाटील, मावस बंधू माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्काने क्षितिज यांनी राजकारणातले कौशल्ये आत्मसात केले.

ऋषिकेशचा समाजसेवेचा वारसा
वाचन, लेखन, नवनवीन विषयाची माहिती जाणून घेण्याची महत्वाकांक्षा व कामकाजात प्रत्यक्ष त्याचे रुपांतर करण्याची कला असलेले व एम.बी.ए. शिक्षणानंतर परदेशातील नोकरीची कुटुंब इच्छा नाकारत केवळ आपल्या कौशल्याचा आणि शिक्षणाचा फायदा ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकर्‍यांना व्हावी, या उद्देशाने अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचे चिरंजीव ऋषिकेश ढाकणे यांनी माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचा समाजसेवेचा वारसा पुढे तेवत ठेवण्यासाठी आपल्या संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे कदारेश्वर सहकारी साखर कारखान्यात जातीने लक्ष घातले. तज्ज्ञ संचालक असलेल्या ऋषिकेश यांच्यामुळे केवळ हा कारखाना आज समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यातूनच ऋषिकेश यांची शेतकर्‍यांबाबत असणारी तळमळ निदर्शनास येते.

Back to top button