नगर : ऑक्सिजन निर्मितीचे दोन कोटी ‘हवेत’! | पुढारी

नगर : ऑक्सिजन निर्मितीचे दोन कोटी ‘हवेत’!

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान कृत्रिम ऑक्सीजनचाही तुटवडा होता. त्यामुळे ऑक्सीजनअभावी अनेक रुग्णांचा बळी गेला. जिल्हा रुग्णालयातही हेच भयानक चित्र होते. अशावेळी हवेतून ऑक्सीजन निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प चर्चेत आला. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हा रुग्णालयात तब्बल दोन कोटींचा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारला गेला. मात्र, वाढीव वीज बिलाच्या कारणामुळे आता वर्षे उलटले, तरीही अद्याप हा प्रकल्प दैनंदिन सुरू केला नसल्याचे समोर आले आहे.

शासनाने मोठ्या खर्चांतून उभारलेले जिल्हा रुग्णालय हे सदैव वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. या ठिकाणी 282 बेड आहेत. त्या तुलनेत मनुष्यबळ हे कमीच आहे. मध्यंतरी सन 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा बैठकीत या ठिकाणी हवेतून ऑक्सीजन प्रकल्पाला मान्यता दिली होती.

त्यावर शासनाकडूनही यासाठी सुमारे दोन कोटी 27 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पुणे येथील एका नामांकीत कंपनीने या प्रकल्पाचे काम पूर्ण केले. तत्कालिन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही या प्रकल्पाचे काम सुरू असताना पाहणी केली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर हवेतून ऑक्सीजन निर्मिती होऊन त्यातून रुग्णांना आधार होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, आता वर्षे लोटले तरीही हा प्रकल्प शेडमध्ये बंदच दिसत आहे.

प्रति प्लांट 20 हजार लिटर ऑक्सिजन!
जिल्हा रुग्णालयाकडे कृत्रिम ऑक्सिजन निर्मिती करणारे दोन प्लांट कार्यरत आहेत. या प्रकल्पातून दररोज प्रत्येकी 20 हजार लिटरची ऑक्सिजन निर्मिती सुरू असल्याचा दावा केला जात आहे. अत्याधुनिक पद्धतीने पाईपलाईनव्दारे आयसीयूपर्यंत हा ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे हे स्वतः लक्ष देवून आहेत. मात्र, हवेतून ऑक्सिजन निर्मितीला खर्च नसताना दुसरीकडे कृत्रिम ऑक्सिजन निर्मितीसाठी लिटरमागे 18 ते 20 रुपयांचा खर्च लागत असल्याचेही वास्तव आहे.

दैनंदिन 1250 सिलेंडरची क्षमता!
जिल्हा रुग्णालयातील या प्रकल्पाचा वापर झाल्यास दररोज 1250 सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती शक्य होणार आहे. शिवाय, वीज बिलाशिवाय अन्य दुसरा कोणताही खर्चही यासाठी लागणार नसल्याचेही सांगितले जात आहे. परंतु, हवेतून निर्माण होणार्‍या या ऑक्सिजनमध्ये पुरेशा मात्रा नसल्याने त्याचा व्हेंटीलेटरवरील रुग्णाला उपयोग होत नाही. त्यामुळे या ऑक्सिजनच्या वापराला मर्यादा येतात, असेही सांगितले जात आहे.

तालुक्यातील 14 प्रकल्पही चर्चेत
कोरोनात ऑक्सीजनची समस्या भेडसावली. ऑक्सीजन न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. याबाबत दखल घेताना जिल्ह्यातील 14 ग्रामीण रुग्णालयामध्ये हवेतून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पासाठी मोठा निधी दिला होता. प्रत्येक प्रकल्पासाठी 1.53 कोटींचा खर्च झाला. तर त्यातून दररोज 650 सिलेंडर ऑक्सिजन तयार होणार आहे. मात्र आजमितीला काहींचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे, तर काही शोभेच्या वास्तू बनल्याचे समोर आले आहे.

तर, वीजबिल वसूल
सध्या ऑक्सिजनची गरज नसल्याने प्रकल्प बंद ठेवण्यापेक्षा ऑक्सिजन निर्मिती करून तो गरज असलेल्या हॉस्पिटलला, खासगी हॉस्पिटलला किंवा अन्य ठिकाणी वितरीत केल्यास त्यामधून मिळणार्‍या उत्पन्नातून वीजबिल किंवा अन्य खर्च मार्गी लागू शकतो. अर्थात शासनाच्या धोरणात हे बसत असेल, तर तस व्हायला हवे, असे शिवसेनेचे दीपक पंडीत म्हणाले.

महावितरणची टांगती तलवार!
जिल्हा रुग्णालयातील हा प्रकल्प सुरू करण्यासाठी वीजबिलाचा मोठा खर्च येणार आहे. अगोदरच महावितरणकडून 65 लाखांच्या वसुलीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे तगादा सुरू आहे. शासनाकडूनही वीजबिल भरण्यासाठी अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी वीज पुरवठा खंडीत होण्याचीही भिती आहे. अशावेळी हा प्रकल्प सुरू केलाच, तर वीजबिलाचा आणखी भार पडणार आहे. त्यामुळे तूर्त हा प्रकल्प सुरू करणे महागडे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हा रुग्णालयाचा संबंधित प्रकल्प सुरू आहे. मात्र, वीज बील अधिक येत असल्याने तो वापरणे परवडणारे नाही आणि त्याची सध्या गरज नाही. ज्यावेळी गरज भासेल, त्यावेळी निश्चितच या प्रकल्पाचा रुग्णांना फायदा होईल.
                                                        -डॉ. संजय घुगरे, जिल्हा शल्यचिकित्सक

Back to top button