सुफी मुस्लिम धर्मगुरू हत्याकांडातील तीन आरोपींना राहुरीत बेड्या | पुढारी

सुफी मुस्लिम धर्मगुरू हत्याकांडातील तीन आरोपींना राहुरीत बेड्या

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्यात चर्चेचे ठरलेल्या अफगाणी सुफी मुस्लिम धर्मगुरू ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांच्या हत्याकांडातील तीन आरोपींना राहुरी पोलिसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले आहे. संतोष हरिभाऊ ब्राम्हणे (वय 27, रा. समता नगर, कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (वय 26, रा चवडी जळगाव ता. मालेगाव) व विशाल सदानंद पिंगळे (वय 23, रा. कोपरगाव) अशी पकडलेल्या आरोपींची नाव आहेत.

नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात हे हत्याकांड घडले होते. डोक्यात गोळी घालत त्यांची हत्या करण्यात आली होती. अफगाण येथील रहिवासी असलेले सुफी मुस्लिम धर्मगुरू ख्वाजा चिश्ती यांनी नाशिक परिसरामध्ये अनेक वर्षांपासून धार्मिक व सामाजिक कार्यातून हजारो लोकांशी आपुलकीने संबंध निर्माण केले होते. त्यांनी नाशिक परिसरासह राज्यात अनेक ठिकाणी प्रॉपर्टी निर्माण केली होती. कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी व हजारो मानणारा वर्ग या वादातूनच मुस्लिम धर्मगुरूची हत्या झाल्याची चर्चा राज्यात झाली.

राज्यात खळबळ उडवून देणार्‍या या घटनेतील आरोपींना पकडणे हे राज्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नाशिक स्थानिक गुन्हे शाखेसमोर मोठे आव्हान होते. दरम्यान, त्यांना हवे असलेले या हत्याकांडातील आरोपी राहुरी पोलिसांकडून बुधवारी (दि.3) रात्री 10 वाजता पकडण्यात आले. राहुरी पोलिसांच्या सतर्कतेने राज्य पोलिस प्रशासनाला हवे असलेले आरोपी सापडल्याने घटनेचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.

राहुरी हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा पकडल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सज्जन नर्‍हेडा हे घराकडे निघाले असताना, त्यांना गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली. राहुरी येथील सर्जा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी काही संशयित आल्याचे त्यांना समजले. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिसांनी हॉटेल सर्जा येथे धडक देत आरोपींना घेरले. आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसे सापडली.

हा प्रकार पाहता हॉटेल मालकांसह उपस्थित प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. पोलिसांनी शिताफीने तिन्ही आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता, संबंधित आरोपी हे मुस्लिम धर्मगुरू हत्याकांडातील असल्याचे समजले. श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक सज्जन नर्‍हेडा, पोलिस हवालदार आजिनाथ पाखरे, नितीन शिरसाठ, कुटे, कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button