नगर : वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुसाट ! ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी हटली | पुढारी

नगर : वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुसाट ! ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी हटली

श्रीकांत राऊत : 

नगर : कोरोना संकटात मंदावलेला वाहन विक्री व्यवसाय आता पूर्वपदावर आला आहे. कोविड संकटातून सावरलेला ऑटोमोबाईल क्षेत्रात खरेदीची धूम सुरू झाल्याचे दिसते. नगर जिल्ह्यात गतवर्षापेक्षा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांतच सात हजारपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाल्याची आकडेवारी परिवहन कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. कोरोना संकटाचा व्यापार, व्यवसायांवर विपरित परिणाम झाला होता. विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका सहन करावा लागला होता.

कोविड संकटातून सावरलेल्या नगरकरांची पावलं आता पुन्हा एकदा वाहन खरेदीकडे वळाल्याचे दिसते. कोविड निर्बंधांमुळे 2020-21 आर्थिक वर्षांत मंदावलेली वाहन खरेदी 2021-22 मध्ये वाढली आहे. मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू होताच वाहन खरेदी थांबली होती. निर्बंधामुळे वाहन उद्योग क्षेत्राची चाके आर्थिक संकटात रूतली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरून निर्बंध शिथिल होताच वाहन खरेदीत वाढ होत आहे. ही वाढ ऑटोमोबाईल क्षेत्राला दिलासा देणारी ठरत असून, इतर क्षेत्रांच्या तुलनेत वाहन उद्योग क्षेत्र उभारी घेत असल्याचे चित्र आहे.

निर्बंध हटल्यानंतर जानेवारी महिन्यापासून दुचाकी विक्रीला तेजी आली आहे. ती आजही कायम आहे. दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दसरा-दिवाळी सणोत्सवात वाहन विक्रीत वाढ होईल, असा आशावाद वाहन विक्रेत्यांनी व्यक्त केला.

Back to top button