नगर : पोलिसांची लाचखोरी चव्हाट्यावर! | पुढारी

नगर : पोलिसांची लाचखोरी चव्हाट्यावर!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  तोफखाना पोलिस ठाण्यातील अंमलदार पंटरमार्फत लाच घेताना नाशिक ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकल्यापाठोपाठ शेवगाव उपअधीक्षक कार्यालयातील हवालदारासही 40 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सलग दोन दिवस दोन लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने पोलिस दलातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. शेवगाव पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील हवालदार संजय जनार्धन बडे (वय 52, वामानभाऊ नगर, पाथर्डी) असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिसाचे नाव आहे.

तक्रारदार व त्यांचे मित्र हे भागीदारीत जेसीबीचा व्यवसाय करतात. तक्रारदारांनी अवैधरित्या मुरूम उपसा केला म्हणून गुन्हा दाखल न करण्यासाठी व जेसीबी जप्त न करण्यासाठी दि. 13 जुलै रोजी हवालदार बडे याने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबतची एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती.

दि. 3 ऑगस्ट रोजी हवालदार बडे याला एसीबीने 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पोलिस अंमलदार रमेश चौधरी, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, राहुल डोळसे आदींच्या पथकाने केली.

लाचखोरी बळावली
सलग दोन दिवसांत नगर पोलिस दलातील दोन कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने जनमानसात खाकीची प्रतिमा मलिन होत आहे. लाचेच्या कारवायांमुळे पोलिसांमध्ये लाच मागण्याची प्रवृत्ती बळावल्याचे दिसून येते.

Back to top button