नगर : ‘त्या’ कुटुंबांसाठी समाधान शिबीर घेणार, मिशन वात्सल्य कमिटीची बैठक | पुढारी

नगर : ‘त्या’ कुटुंबांसाठी समाधान शिबीर घेणार, मिशन वात्सल्य कमिटीची बैठक

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनामध्ये ज्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला, त्या कुटुंबांचा योग्य पद्धतीने सर्व्हे करून ऑगस्टअखेरीस महापालिका समाधान शिबीर घेणार आहे. त्याद्वारे शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचविणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली. मनपामध्ये मिशन वात्सल्य कमिटीची बैठक अध्यक्ष तथा आयुक्त डॉ. जावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला कमिटीचे सचिव व महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर पाटील, कृती दलाचे अशासकीय सदस्य अशोक कुटे, अशासकीय सदस्य सावित्रा तौर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त जावळे म्हणाले, अंगणवाडी सेविकांमार्फत मनपा हद्दीतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचा जिओ टॅगिंगमार्फत सर्व्हे करण्याचे आदेश आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागाला दिले आहेत. हा सर्व्हे झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कुटुंबांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी समाधान शिबीर घेण्यात येणार आहे. अशासकीय सदस्य अशोक कुटे यांनी महिलांना रोजगार, व्यवसायासाठी मनपा हद्दीतील एखाद्या जागेची मागणी केली. संबंधितांना अगोदर महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत प्रशिक्षण देऊन बचत गट स्थापन केल्यानंतर जागेचा विचार करू, असे आयुक्त डॉ. जावळे यांनी सांगितले. महिलांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना केल्या. कमिटीचे सचिव सुधीर पाटील यांनी या कुटुंबाना परसबागेसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाला केल्या.

Back to top button