नगर : शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडा; आयुक्त जावळे यांच्या सूचना | पुढारी

नगर : शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडा; आयुक्त जावळे यांच्या सूचना

नगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रत्येक भागात वेळेवर पाणी सोडण्याचा प्रयत्न करा आणि वेळेवर हजर राहून कामे करा. अनधिकृत नळकनेक्शन आढळल्यास तोडून टाका, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या.

आयुक्त जावळे यांनी सोमवारी सायंकाळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची आढावा बैठक घेतली. यावेळी जलअभियंता परिमल निकम, उपअभियंता रोहिदास सातपुते यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, व्हॉल्व्हमन उपस्थित होते. गत आठवड्यात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग पंधरामधील महिलांनी पाणीप्रश्नावर थेट आयुक्तांना निवेदन देऊन गार्‍हाणे मांडले होते. तर, स्थायी समितीच्या बैठकीत ही वॉलमन व्यवस्थित पाणी सोडत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली.

आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले, महापालिकेचे ब्रीद वाक्य असे आहे की, नगरकरांना निरंतर सेवा द्यायची आहे. त्यानुसार उपाययोजना होणे गरजेचे आहे. संपूर्ण नगर शहराला दिवसाआड पाणी देण्यासाठीचे नियोजन करा. अनधिकृत नळ कनेक्शनची मोहीम हाती घेऊन सात दिवसांत अहवाल द्या. त्यानंतर नळ तोडणी मोहीम राबवावी. कोणालाही घाबरायचे कारण नाही. जे कोणी मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करतील, त्यांच्यावर 353 चा गुन्हा दाखल करण्यात येईल. प्रत्येक नगरकरांशी कर्मचार्‍यांनी सामंजस्याने वागावे.

अमृत पाणी योजनेचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण करून, फेज टू पाणी योजना संपूर्ण शहरात कार्यान्वित करा व जुन्या पाईपलाईन बंद करा. नगरकरांनी फेज टू पाणी योजनेचे नळ कनेक्शन घेण्यासाठी सहकार्य करावे. जेणेकरून नगरकरांना स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होईल. नगर शहर पूर्णपणे टँकर मुक्त करायचे आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाने चोखपणे काम करावे. कामात दिरंगाई व हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. पाणीपुरवठ्याचा खर्च व वसुलीमध्ये मोठी तफावत आहे. यासाठी पाणीपट्टी भरण्याचे नागरिकांकडून नियोजन करावे.

नळकनेक्शन अधिकृत करून घ्या

मुकुंदनगर भागाला दिवसाआड पाणी देण्यासाठी फेज टू पाणी योजना कार्यान्वित करा. मुकुंदनगरमधील पाण्याची टाकी भरावी. मुकुंदनगरमधील सुमारे एक हजार नळ कनेक्शन अनधिकृत आहेत. हे नळ कनेक्शन नियमित करून घ्यावेत. अन्यथा नळ कनेक्शन तोडणी मोहीम राबविण्यात यावी, असे आदेश आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.

Back to top button