नगर : अडवलेला रस्ता खुला व्हावा यासाठी दौंड-उस्मानाबाद रोडवर अडीच तास रास्ता रोको | पुढारी

नगर : अडवलेला रस्ता खुला व्हावा यासाठी दौंड-उस्मानाबाद रोडवर अडीच तास रास्ता रोको

राशीन, पुढारी वृत्तसेवा : राशीन येथील प्रभाग क्रमांक 2 मधील राज्य महामार्ग 68 लगत असणाऱ्या सरोदेवस्ती वरून जाणारा ग्रा. म. 72 क्रमांकाचा रस्ता खुला व्हावा यासाठी आज दौंड-उस्मानाबाद रोडवर सरोदे वस्ती येथे ग्रामस्थांच्या वतीने अडीच तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रस्त्यालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांने मशीनच्या साहाय्याने दगड लावून रस्ता उत्खनन केले व त्यावर झाडे लावले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास तर सहन करावा लागत आहेत. परंतु रस्ता बंद झाल्याने मागील 10 ते 12 दिवसापासून मुले शाळेत देखील जाऊ शकले नाहीत. यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल विद्यार्थी पालक करत आहेत.

बेकायदेशीर रित्या अडवलेला रस्ता पाच दिवसात खुला करून देण्यात येईल, अशी आश्वासन राशीनचे मंडल अधिकारी प्रकाश कुंदेकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अडीच तास झालेले रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राशीनचे उपसरपंच शंकर देशमुख, युवक नेते भीमराव साळवे, श्याम कानगुडे, ॲड . युवराज राजेभोसले, भाजपचे राशीन शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, आदींसह सरोदेवस्ती , मोहितेवस्ती , मोढळेवस्ती , राऊतवस्ती येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज मंगळवार राशीन येथील आठवडे बाजार असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा दुतर्फा लागल्या होत्या . यावेळी राशीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिरसाठ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता .

बेकायदेशीर रित्या अडवलेला रस्ता खुला करून न दिल्यास कर्जत चे तहसीलदार यांच्या आदेशाने नोटीस काढून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल व रस्ता खुला करून देण्यात येईल

                                                                         – प्रकाश कुंदेकर, मंडलअधिकारी

Back to top button