

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : सीना कालव्या शेजारी असलेल्या एकूण 70 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे सीना कालव्यावरील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडलेे.
आ. पवार यांच्या माध्यमातून सीना कालव्यात साठलेला 70 ते 72 किलोमीटर गाळ 30 वर्षात पहिल्यांदाच काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे 15 किलोमीटरचा डीपकट असलेल्या ठिकाणी लाँग बोंब मशीनने तो पॅच पूर्ण करून आणण्यात आला. त्यामुळे पाण्याला येणारा अडथळा कमी होऊन 70 ते 73 किलोमीटरचा टेलचा जो भाग आहे, त्या ठिकाणी 73 किलोमीटरपर्यंत सध्या पाणी पोहोचत आहे. तसेच, सीना कालव्यावर एकूण 150 गेट देखील बसविण्यात येणार असून, त्यापैकी 50 गेट बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 100 गेट बसविण्याचे काम सुद्धा सुरू आहे. कालव्यावरील रस्ता केल्याने हजारो लोकांचा फायदा होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सीना कालव्याशेजारील रस्ता हा झाडाझुडपांनी वेढलेला पाहायला मिळत होता. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी व शाळकरी मुले यांना रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हे लक्षात घेऊन आ. पवार यांनी सीना कालव्याशेजारील रस्ता मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. अलीकडेच झाडेझुडपे पूर्णपणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला आहे.
या रस्त्याच्या कामामुळे निमगाव गांगर्डा, घुमरी, बेलगाव, कोकणगाव, मिरजगाव, रातंजन, नागलवाडी, नागापूर, गंगेवाडी, माही, जळगाव, पाटेगाव, नवसरवाडी, आनंदवाडी, निमगाव डाकू व पाटेवाडी या परिसरातील नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी फायदा होणार आहे. तसेच, शेताकडे जाण्यासाठी मजबूत व चांगला रस्ता झाल्याने शेती मालाची वाहतूक करण्यासाठी व शेताकडे ये-जा करण्यासाठी देखील याची मदत होणार आहे.