नगर : आरक्षणावर पाचपुतेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार | पुढारी

नगर : आरक्षणावर पाचपुतेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद गट व गणांच्या आरक्षण सोडतीवर अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह इच्छूक कार्यकत्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी आढळगाव गटाच्या आरक्षणाबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.

याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी अकोले तालुक्यातील सर्वच सहा गटांची आरक्षण सोडत चुकीची झाली असल्याची हरकत नोंदविली आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे फेरआरक्षण काढावे, अशी मागणी काहींनी हरकतीव्दारे केली. सोमवारपर्यंत एकूण 35 हरकती दाखल झालेल्या आहेत. मंगळवारी हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

आरक्षणावर ३५ हरकती दाखल

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. या आरक्षण सोडतीबाबत 2 ऑगस्टपर्यंत हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. सोमवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 35 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव गटाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निघाले असून, ते चुकीचे आहे. हे आरक्षण बदलण्यात यावे, अशी मागणी आमदार पाचपुते यांनी केली. आढळगाव गटाच्या आरक्षणाविरोधात विजय शेंडे, सचिन भोस, अमर छत्तीसे, महादेव सोनवणे, रोहिदास पवार, प्रवीण म्हस्के यांनी हरकती दाखल केल्या आहेत.

अकोले तालुक्यातील सहाही गटांचे आरक्षण चुकीचे पडले आहे. त्यामुळे पुन्हा आरक्षण सोडत काढावी, अशी मागणी अशोक भांगरे, धीरेंद्र सगभोर, अजित भांगरे आदींनी केली आहे. संवत्सर गटासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले असून, या आरक्षण सोडतीवर सोमनाथ निरगुडे यांनी हरकत घेतली. सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडत पुन्हा काढण्याची मागणी त्यांनी केली. महिला संवर्गाचे आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे पुन्हा आरक्षण काढण्याची मागणी सुधीर वैरागर यांनी केली. जिल्ह्यात सर्वसाधारण महिला गटाचे आरक्षण चुकीचे आहे. ते बदलावे, अशी मागणी मयूर पटारे यांनी केली.

जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत पुन्हा नव्याने काढावी, अशी मागणी दत्तात्रय जाधव यांनी केली. महेंद्र पटारे, जितेंद्र तोरणे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील गटांबाबत तक्रार केली. याशिवाय विश्वास चितळे (मिरजगाव), सोनईचे सरपंच सखाराम वाघ यांनी (सोनई), मोहन शेगर (बेलपिंपळगाव), सोमनाथ कराळे (शिंगणापूर), संदीप कुसळकर (सोनई), अशोक हिवाळे (उंदीरगाव), अशोक गोंधळे (पेडगाव गण), सागर पटारे (टाकळीभान), पोपट चौधरी (पाडाळणे), समीर अब्बास पटेल (नवनागपूर ), जालिंदर अडसुरे (बारागाव नांदूर ), रवींद्र सुरवसे, किशोर गायवळ, शरद राजेभोसले व काशिनाथ दौंड (खर्डा), विकास रोहकले (ढवळपुरी) आदींचा हरकतीमध्ये समावेश आहे.

हरकती फेटाळण्यात याव्यात

आढळगाव येथील रहिवासी अनिल ठवाळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे हरकत दाखल केली. आढळगाव गटाची सोडत नियमानुसार झाली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळू नये, यासाठीच हरकती घेतल्या जात आहेत. आरक्षणात फेरबदल केला, तर अनुसूचित जातीच्या जनतेवर अन्याय ठरेल. त्यामुळे हरकती फेटाळण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

Back to top button