नगर : सायबर गुन्ह्यांचा आकडा वाढतोय! | पुढारी

नगर : सायबर गुन्ह्यांचा आकडा वाढतोय!

नगर, श्रीकांत राऊत : गल्ली किंवा सार्वजनिक ठिकाणावरील गुंडगिरीला लगाम लावण्याबरोबरच सायबर चोरट्यांना पायबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सायबर क्राईमचा टक्का वाढत असून, सोशल मीडियाच्या आडून धमक्या, फसवणकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सायबर चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. हातातील मोबाईलचा आर्थिक फायद्यासाठी वापर करण्यात सायबर चोरटे आघाडीवर आहेत. स्मार्टफोनचा वाढलेला वापर दिवसेंदिवस घातक ठरत असून, सोशल मीडियावर आलेल्या फसव्या लिंक, मेसेज, झटपट लोन घेण्याच्या भानगडीत अनेकांना चुना लावण्यात सायबर चोरट्यांना यश येत आहे.

सायबर चोरट्यांच्या जाळ्यात ‘नगरकर’ही अडकले आहेत. सायबर पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी 19 गुन्ह्यांची नोंद पोलिस दप्तरी होती. दरम्यान, यावर्षी आतापर्यंत तब्बल 43 गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे सायबर क्राईम झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. मोबाईलवर आलेल्या फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आणि सोशल मीडियाचा वापर करत असताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

गुन्हेगारीला लगाम लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान

सायबर गुन्हा घडल्यानंतर चोरट्यांना गजाआड करण्यात पोलिसांना बराच काळ लागतो. सायबर चोरटे गुन्हा करताना अनेक शक्कली लढवत असल्याने पोलिसांसमोर सायबर चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान असते.

असा वाढला टक्का!

स्मार्ट फोनचा वाढलेला वापर सायबर चोरट्यांच्या पथ्यावर पडत असून सायबर क्राईममध्ये सातत्याने वाढ होत आहे. नगर सायबर पोलिसांच्या आकडेवारिनुसार 2021 मध्ये 19 गुन्हे दाखल झाले होते. तर 2022 जुलै महिन्यापर्यंत तब्बत 43 गुन्हे दाखल झाले आहेत.

या गुन्ह्यांचा समावेश

क्रेडिट कार्ड, सोशल मीडियावरून अश्लिल मेसेज पाठवणे, छेड काढणे, हॅकिंग आणि लॉटरी लागल्याचे मेसेज पाठवूण फसवणूक करणे या प्रकारचे गुन्हे गत सहा महिन्यात दाखल झाले आहेत.

सायबर गुन्ह्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ झाली आहे. चालू वर्षांत आतापर्यंत 43 गुन्हे दाखल झाले आहेत.

                                 – प्रतिक कोळी, पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

सात महिन्यातीची वर्गवारी
  • फेसबुक – 4
  • इन्स्टाग्राम – 13
  • क्रेडिटकार्ड – 3
  • फसवणूक – 16
  • व्हॉटस्अ‍ॅप – 5
  • शेअरचॅट – 1
  • ऑनलाईन बँकिग – 1

Back to top button