नगर : मुळा धरणाला श्रावण सरी पावणार का? | पुढारी

नगर : मुळा धरणाला श्रावण सरी पावणार का?

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : आषाढी सरींच्या कृपेने मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. धरणातून जुलै महिन्यातच दरवाजाद्वारे पाणी सोडले जाण्याची अपेक्षा पावसाच्या थांब्याने फोल ठरली. पावसाच्या विश्रांतीमुळे तुरळक आवक होत असल्याने धरण साठा 20 हजार दलघफूच्या समीप घुटमळत असल्याचे चित्र आहे.

नगर दक्षिणेची तृष्णा भागविणार्‍या मुळा धरण सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आगेकूच करीत असतानाच आषाढी समाप्तीला पावसाने थांबा घेतला. धरणाचे पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर पाऊस पडत नसल्याने धरणसाठा 20 हजारी होण्यासाठी पाच दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आषाढी सरींची कृपा झाल्यानंतर श्रावण सरी धरण पाणलोट क्षेत्रावर बरसल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अवधी लागणार नाही. मुळा धरणाचा साठा 27 जुलै रोजी 19 हजार 196 दलघफू इतका झाला होता.

पाच दिवसामध्ये धरणसाठ्यात केवळ 400 दलघफू इतक्याच पाणी साठ्याची वाढ झाली. परिणामी 31 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता मुळा धरणसाठा 19 हजार 695 दलघफू इतका नोंदविण्यात आला, तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पाऊस नसल्याने डोंगर दर्‍यातून झिरपणार्‍या पाण्याचा 886 क्युसेकने नवीन पाण्याची आवक धरणाकडे होत असल्याची नोंद कोतूळ येथील सरिता मापन केंद्रात झालेली आहे.

कधी ढगाळ वातावरण, तर कधी स्वच्छ सूर्यप्रकाश पडत असल्याने धरणाचे लाभक्षेत्र व पाणलोट क्षेत्रावर पावसाचा ओलावा कमी झाला आहे. आषाढी सरींमुळे धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. धरणाने 31 जुलैपर्यंत 20 हजार दलघफू पाणीपातळी गाठली असती, तर धरणाच्या दरवाजातून नदी पात्रात विसर्ग सोडला जाण्याची शक्यता होती. परंतु पाच दिवसांपासून धरण साठा 20 हजार दलघफूच्या समीप येऊन ठेपला असताना आवक कमी असल्याचे दिसत आहे.

आता 87 टक्के धरणसाठ्याची प्रतीक्षा

15 ऑगस्टपर्यंत धरण साठा 22 हजार 800 दलघफू (87 टक्के) इतका झाल्यास धरणातून पाणी सोडले जाईल, असा शासकीय निर्देशांक असल्याची माहिती शाखा अभियंता कांबळे यांनी दिली. 15 ऑगस्टपर्यंत धरण 87 टक्के भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Back to top button