नगर : ‘त्या’ मृतदेहाचे गूढ अद्याप कायम | पुढारी

नगर : ‘त्या’ मृतदेहाचे गूढ अद्याप कायम

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील चास शिवारातील एका मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्या मृतदेहाचे पुणे येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन नगर तालुका पोलिसांनी केले असून, त्याबाबत शोध पत्रिका प्रसिद्ध केली आहे.

चास शिवारात महामार्गापासून सुमारे तीन किलोमीटर आतील डोंगराळ भागात साहेबराव लक्ष्मण गावखरे यांच्या शेतात सुमारे 25 ते 30 गुंठे जागेत मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याबाबतची माहिती तेथील पोलिस पाटील रमेश मुरलीधर रासकर यांनी नगर तालुका पोलिसांना दिली होती. दरम्यान, या घटनेने चास परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर मृतदेहाजवळच महिलेचे कपडे, केस, मंगळसूत्र, डोक्याची कवटी पोलिसांना आढळून आली होती. सुमारे 30 ते 35 वर्षे वयाचा हा मृतदेह असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.

दरम्यान, याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी शोध पत्रिका प्रसिद्ध केली आहे. अंदाजे 30 ते 35 वयोगटातील एक महिलेची काळ्या रंगाची साडी, त्यावर केशरी नक्षी, हिरव्या रंगाचे ब्लाऊज, त्यावर सोनेरी किनार, काळ्या पिवळ्या मण्यांचे मंगळसूत्र मिळून आले आहे. सदर ठिकाणी फक्त कवटी व हाडे मिळून आली असून, अंदाजे एक महिन्यापूर्वीच मयत झालेली आहे. या वर्णनाची महिला मिसिंग असल्यास नगर तालुका पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button