नगर : कोळगावमध्ये पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

नगर : कोळगावमध्ये पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ

कोळगाव, पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे शनिवारी रात्री 12 ते रविवारी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान चार ते पाच चोरट्यांनी कोळाई देवीचे मंदिर, मंदिर पायथ्याशी असलेले किराणा दुकान व कोळगाव फाट्यावरील बियर शॉपचे शटर तोडून सुमारे रोख रकमेसह एक ते सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला.

कोळगावचे आराध्य दैवत श्री कोळाईदेवी मंदिरात शनिवारी रात्री 12 वाजता चार ते पाच चोरट्यांनी मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजाचे कुलूप तोडून मंदिराची दानपेटी चोरून नेली. या दानपेटीत सुमारे 4 हजार रुपये होते, ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाली आहे. चोरट्यांनी पुढे मंदिराच्या पायथ्याशी बाळासाहेब कोल्हे यांच्या संतकृपा या किराणा दुकानाचे शटरचे कायंडेे तोडून दुकानातील 15 ते 20 हजार रुपयांचे किराणा सामान चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा नगर-दौंड महामार्गावर जगताप यांच्या पेट्रोलपंपासमोर दीपक नलगे यांच्या मालकीच्या निखिल बियर शॉपीचे शटर उचकटून आतील विविध कंपन्यांचे 80 हजार ते एक लाख रुपये किमतीचे बियरचे सुमारे 15 ते 20 बॉक्स चोरून नेले.

एकाच रात्री तीन ठिकाणी चोर्‍या करून रोख रकमेसह एक ते सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात मंदिराचे पुजारी राजेंद्र गुरव यांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती समजताच बेलवंडीचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करत पुढील तपास सुरू केला आहे.

असाही योगायोग…

काल कोळगावमध्ये रात्री ज्या वेळेला चोर मंदिरामध्ये चोरी करत होते. त्याच वेळेला पोलिसांची गस्त चालू होती. पोलिसांनी 11.55 मिनिटांनी एटीएमच्या समोर फोटो काढले व चोरांनी त्याच सुमारास श्री कोळाईदेवी मंदिरातील 11.59 मिनिटांनी रोकड लांबवली, हा योगायोग म्हणावा लागेल. म्हणजे चोर आणि पोलिस एकाच वेळेला कोळगावमध्ये होते.

दानपेटी चोरल्याने ग्रामस्थ संतप्त

कोळगाव परिसरात मागील काही दिवसांत वाढलेल्या चोर्‍यांच्या घटनामुळे नागरिकांनी, व्यापार्‍यांनी धास्ती घेतली आहे. मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आजपर्यंत देवीच्या मंदिरात व कोल्हे यांच्या दुकानात सहा महिन्यांत ही दुसरी चोरीची घटना असून, चोर्‍यांचे सत्र काही थांबेना. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Back to top button