

पारनेर; पुढारी वृत्तसेवा: पारनेर तालुक्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जनावरांनी भरलेला टेम्पो कर्जुले हर्या येथून पकडून, तो टाकळी ढोकेश्वर पोलिस चौकीत आणून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यामुळे 6 जणांच्या टोळक्याने बजरंग दलाच्या तीन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम खंडू सूळ (वय 23, रा.हांडेवाडा वारणवाडी, ता. पारनेर), अमोल सुरेश आंधळे (वय 26, रा. कर्जुले हर्या, ता पारनेर) व अक्षय तुकाराम कारंडे (रा. वारणवाडी, ता पारनेर) अशी मारहाण झालेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
या तिघांनी शाहरुख रमजान शेख (रा.ठिकेकरवाडी, ता.जुन्नर, जि. पुणे) याच्या ताब्यातील जनावरांनी भरलेला टेम्पो कर्जुले हर्या येथे पकडून तो टाकळी ढोकेश्वर पोलिस चौकीमध्ये आणून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यानंतर हे तिघे पारनेर रस्त्यावर चारचाकी वाहन उभे करून त्यात बसलेले होते. त्यावेळी अश्फाक सादिक पठाण (रा.वडज ता जुन्नर), शफिक शेख, फयाज शेख (दोघे रा.बेल्हा, ता.जुन्नर) इसाक (पूर्ण नाव माहित नाही, रा.जुन्नर), सोहेल बुढण व हरित बुढण (दोघे रा.बेल्हा, ता जुन्नर) हे तेथे पांढर्या रंगाची कार व मोटरसायकलवूरन आले.
हातातील लाकडी काठ्या व लोखंडी रॉडने त्यांनी शुभम सूळ व त्याचे साथीदार बसलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले. शुभम सूळ, अमोल आंधळे व अक्षय कारंडे यांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. आमच्या जनावरांच्या गाड्या अडविता, पोलिसांना खबर देता, आता वाचले, परत आमचे गाड्या अडविल्या व पोलिसांना माहिती दिली, तर तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी शुभम सूळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.