भिंगाणला स्मशानभूमीसाठी दहा लाख : आ.पाचपुते | पुढारी

भिंगाणला स्मशानभूमीसाठी दहा लाख : आ.पाचपुते

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे पावसात वर ताडपत्री धरून मृत व्यक्तीच्या चितेला दोनदा अग्निडाग द्यावा लागला. तालुक्याचे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना जाग येईल का? असा सवाल येथील आदिवासी समाजाने केल्यानंतर हेच वास्तव ‘दैनिक पुढारी’ने वृत्तातून मांडले. त्याची तातडीने दखल घेत आमदार बबनराव पाचपुते यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून सुमारे दहा लाख रुपयांचा निधी येथील स्मशानभूमीसाठी मंजूर केल्याचे ‘दैनिक पुढारी’शी बोलताना सांगितले.
तालुक्यातील भिंगाण येथील आदिवासी समाजातील अंकुश गुलाब गायकवाड या आदिवासी भिल्ल समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला.
स्मशानभूमीला वर शेड नसल्याने मुसळधार पावसात अंत्यविधी कसा करायचा असा प्रश्न होता. मृतदेह जास्त वेळ ठेवता येणार नसल्याने, सर्वांनी मिळून वर ताडपत्री धरून दोनवेळा अग्नी देऊन अंत्यविधी केला. स्मशानभूमीअभावी मृत व्यक्तींची होत असलेली हेळसांड, गावातील नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा, आदिवासी समाजाकडे प्रशासन व नेतेमंडळींचे होत आलेले दुर्लक्ष याबाबतचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते
आमदार बबनराव पाचपुते यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन भिंगाण येथील आदिवासी समाजातील लोकांच्या स्मशानभूमीसाठी सुमारे दहा लाख रुपये जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर केले आहेत. तसे पत्र आमदार पाचपुते यांनी चोराचीवाडी ग्रामपंचायतीला दिले आहे. त्याबद्दल चोराचीवाडी येथील कार्यकर्ते तुकाराम चव्हाण, भीमराव लांडगे, अ‍ॅड.जे. डी. अनभुले यांनी त्यांचे आभार मानले.

गावात मूलभूत सुविधांची वानवा
देशाच्या स्वातत्र्यांला 75 वर्षे पूर्ण होत आलेली असताना, हे आदिवासीबहुल गाव विकासापासून वंचित आहे. गावात आरोग्य, वीज, अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी या मुख्य समस्या आहेत. त्यांची सोडवणूक करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मिळालेल्या निधीमुळे आदिवासी समाजाच्या समशानभूमीचा प्रश्न सुटेल, असे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button