कोल्हार खुर्द ग्रामपंचायत आरक्षण जाहीर | पुढारी

कोल्हार खुर्द ग्रामपंचायत आरक्षण जाहीर

कोल्हार खुर्द :  पुढारी वृत्तसेवा : कोल्हार खुर्द ग्रामपंचायतची सदस्य मंडळाची मुदत संपत आल्याने निवडणूक विभागाने कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीसाठीचे आरक्षण विशेष ग्रामसभेत जाहीर केले. त्यामुळे ‘काही ठिकाणी खुशी, कही गम’ असे चित्र पहावयास मिळाले. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा उपसरपंच आशा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाली. ग्रामपंचायतीची मुदत येत्या नोव्हेंबर अखेर संपुष्टात येत आहे. पुढील पंचवार्षिकसाठी नवीन सदस्य निवडीसाठी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. यामध्ये अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला असून, काहींसाठी मात्र चालून संधी आल्याचे चित्र दिसत आहे.

कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीसाठी एकूण पाच प्रभाग आहेत. प्रभाग 1 मध्ये अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री, प्रभाग 2 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग अनुसूचित जमाती स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री, प्रभाग 3 मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण, प्रभाग 4 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री, आणि सर्वसाधारण तसेच प्रभाग 5 मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण निघाले असून, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांनी अडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हार खुर्दची मागील पंचवार्षिक निवडणूक जनतेतून सरपंच निवड होऊन विखे पाटील गटाचे प्रकाश पाटील सरपंचपदी म्हणून निवडून आले होते. यावेळीही जनतेतून सरपंच निवड असल्याने या पदाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी सर्वच गटांनी सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोल्हार खुर्दच्या ग्रामसभेला कायमच ग्रामस्थ दुर्लक्षित करतात त्यामुळे ग्रामसभा कुणासाठी हा प्रश्न जेष्ठ नागरिक विचारत आहेत.

मागील वेळी निवडणुकीच्यावेळी अनेक घडामोडी घडलेल्या होत्या. आता या निवडणुकीच्या वेळीही अशाच घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे केवळ कोल्हार खुर्दचे नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. लवकर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

ग्रा. पं. सदस्यांना ग्रामसभेबद्दल अनास्था
बहुतेक ग्रामपंचायत सदस्य नेहमी ग्रामसभांना अनुपस्थित राहत असल्याने त्यांना ग्रामसभेबाबत काहीच घेणे- देणे नाही. त्यामुळे त्यांनी पदांवर तरी का रहावे, असा सवाल रिपाइंचे प्रदीप भोसले यांनी केला आहे.

Back to top button