तिकिटाचे पैसे घेऊन वाहक पसार, पारनेर आगाराच्या कंडक्टरचा प्रताप | पुढारी

तिकिटाचे पैसे घेऊन वाहक पसार, पारनेर आगाराच्या कंडक्टरचा प्रताप

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर आगारातील एसटी बसचा वाहक तिकिटाचे पैसे घेऊन तिकीट मशीनसह पसार झाला आहे. याबाबत वाहतूक निरीक्षक रावसाहेब ताराचंद करपे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मनोज विठ्ठल वैरागर (रा. शांतीनगर, तारकपूर, अहमदनगर) हा गेल्या काही वर्षांपासून पारनेर आगारात कंडक्टर म्हणून नोकरीस आहे. दि. 17 रोजी त्यास नगर मुक्कामी ड्युटी होती. या ड्युटीअंतर्गत आळेफाटा व शिरूर या दोन फेर्‍या त्याने केल्या. या दोन फेर्‍या केल्यानंतर तिकिटांची जमा झालेली रक्कम त्याचे आगारात जमा करणे बंधनकारक होते.

मात्र, तसे न करता रक्कम घेऊन तो नगर मुक्कामी गेला. नगरमध्ये बसस्थानकावर पोहोचल्यानंतर तो तिकिटांचा ट्रे, तिकिटांचे ईटीआयएम मशीन, तसेच रोख रक्कम, असा सुमारे 56 हजार रुपयांचा ऐवज घेऊन घरी गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी पावणेसात वाजता ही बस पुन्हा पारनेरकडे येते. मात्र, सकाळी वैरागर नगर बसस्थानकाकडे फिरकलाच नाही. बसच्या चालकाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. झालेल्या घटनेची माहिती पारनेर आगारास देण्यात आल्यानंतर नगर बसस्थानकावरून प्रवाशांना तिकिटे देण्यात येऊन बस पारनेरकडे रवाना करण्यात आली.

वैरागर पसार झाल्याने काही कर्मचार्‍यांनी त्याच्या घरी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या घरास कुलूप असल्याचे आढळून आले. वाट पाहूनही तो न आल्याने वाहतूक निरीक्षक रावसाहेब करपे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार वैरागर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

वैरागरवर आणखीही एक गुन्हा
एसटीच्या कर्मचार्‍यांना राज्य शासनामध्ये सामावून घ्यावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात वैरागर सहभागी झालेला होता. फेब्रुवारी 2022 मध्ये त्याने नगरमध्ये संगमनेर आगाराच्या बसवर दगडफेक करून काचा फोडल्या होत्या. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने त्याच्याविरोधात नगरमध्ये गुन्हा दाखल आहे. यापूर्वी पारनेर आगारातून त्यास निलंबितही करण्यात आले होते.

Back to top button