राहुरी : आरक्षण सोडतीमुळे अनेकांची झाली गोची | पुढारी

राहुरी : आरक्षण सोडतीमुळे अनेकांची झाली गोची

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणाच्या आरक्षणाची सोडतीमध्ये मातब्बरांची पंचाईत झाल्याचे चित्र आहे. पूर्वीच गट व गण तुटल्याने नविन गटामध्ये सुखी संसार पाहण्याचे स्वप्नही आरक्षण सोडतीने हिरावून घेतल्याची स्थिती जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुकांची झाली आहे.

नगर जिल्ह्यात लक्षवेधी ठरणार्‍या व ग्रामिण भागातील राजकीय नेत्यांची जिल्ह्याच्या राजकारणाशी नाळ जोडणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीने राजकीय मातब्बरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यामध्ये पूर्वी पाच गट व दहा गणाच्या माध्यमातून ग्रामिण भागातील लोकप्रतिनिधी कार्यरत होते. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या गट व गणाच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय झाल्यानंतर नूतन गट व गणांची निर्मिती झाली. राहुरीत 6 गट व 12 गणांची निर्मिती होऊन अनेक गावांची गट व गणातून ताटातूट झाली. आता गट व गणाच्या प्रचारावर पाणी फिरवल्याची परिस्थिती आरक्षण सोडतीनंतर निर्माण झाल्याची स्थिती काही इच्छुकांची झाली आहे.

तहसील कार्यालयात झाली सोडत

राहुरी तालुक्यामध्ये सहा गट असून यामध्ये सात्रळ गट (नागरिकांचा मागास प्रवर्ग), टाकळीमिया (सर्वसाधारण स्त्री), उंबरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), गुहा (सर्वसाधारण), बारागाव नांदूर (अनुसूचित जमाती), वांबोरी (सर्वसाधारण) याप्रमाणे आरक्षण सोडत झालेली आहे. तसेच राहुरी येथे तहसील कार्यालयामध्ये जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णयाधिकारी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी पंचायत समितीच्या 12 गणांची आरक्षण सोडत काढली.

यामध्ये कोल्हार खुर्द गण (सर्वसाधारण), सात्रळ (सर्वसाधारण), टाकळीमिया (अ.जा.महिला), मांजरी (सर्वसाधारण), मानोरी (अ.जमाती महिला), उंबरे (अनूसूचित जाती व्यक्ती), ताहाराबाद (सर्वसाधारण), गुहा (सर्वसाधारण महिला), बारागाव नांदूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती), राहुरी खुर्द (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), वांबोरी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), ब्राम्हणी (सर्वसाधारण महिला) या पद्धतीने आरक्षण सोडत झाल्याचे घोषित करण्यता आले.

दरम्यान, स्व. शिवाजीराजे गाडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बारागाव नांदूर गटाचे विभाजन झालेले असतानाच आरक्षणात जि.प.सदस्य धनराज गाडे यांना धक्का बसला आहे. बारागाव नांदूर गट अनुसूचित जमाती व्यक्तीसाठी आरक्षित झाल्याने गाडे यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. सात्रळ गटामध्ये नंदाताई भास्कर गाडे या जिल्हा परिषद सदस्य होत्या. तिथे भास्कर गाडे यांना संधी असणार आहे. ब्राम्हणी गटामध्ये पूर्वी अनु. जमाती प्रवर्गातून महेश सुर्यवंशी हे सदस्य होते. त्यांचा गट संपूष्टात आल्याने त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. वांबोरी गटामध्ये शशिकलाताई पाटील या सदस्या होत्या. वांबोरी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने तेथे अ‍ॅड. पाटील गटासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना, नानासाहेब जवरे यांसाठी लाभदायी ठरणार आहे.

राहुरी खुर्द व मानोरी गणाबाबत हरकत

आरक्षण सोडत सुरू असतानाच राहुरी खुर्द व मानोरी गणासाठी सन 2007 मध्ये नोंद घेतलेल्या आरक्षणाबाबत आक्षेप नोंदविला. आरक्षण सोडतीबाबत चुकीची नोंद घेण्यात आल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. याबाबत निवडणूक नियंत्रक अधिकारी निर्मळ व तहसीलदार शेख यांनी आक्षेप असल्यास दोन दिवसात तक्रार द्यावी. शंकेचे निरसन केले जाईल असे सांगण्यात आले. यावेळी अनेकांनी 2000 सालानंतर झालेल्या चार वेळा निवडणुकीच्या आरक्षण नोंदीबाबत शंका व्यक्त केली.

गुहा गटात उमेदवारांची वाढती संख्या

बारागाव नांदूर गट आरक्षित झाल्याने स्व. शिवाजीराजे गाडे यांच्या गटाला अबाधित ठेवण्यासाठी धनराज गाडे यांनी गुहा गटातून निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू आहे. बारागाव नांदूर गटात पूर्वीच गावे असलेले ताहाराबाद हे गण गुहा गटाला जोडले गेले. गुहा गट हा सर्वसाधारण साठी आरक्षित असल्याने या गटामध्ये साई संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, अमोल भनगडे यांसह गाडे इच्छूक असल्याची चर्चा आहे.

Back to top button